अकोला : शेअर मार्केटमधून मोठ्या परताव्याचे आम्हीच दिल्या जात असेल तर वेळीच सावधान होण्याची गरज आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अकोल्यात अशाच एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमध्ये परताव्याचे आमिष दाखवून अकोल्यातील एका नामवंत डॉक्टराची तब्बल १६ लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी खदान एका आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

मोठा आर्थिक लाभ करून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच एक घटना अकोला शहरात घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. भविष्य तुलसीदास गुरुदासानी हे वर्षभरापासून ऑनलाइन शेअर खरेदी-विक्री करत होते. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना ‘A41 स्टॉक मार्केट गाईड’ या व्हॉट्सॲप ग्रुपवरून संदेश आला आणि त्यामार्फत ते ग्रुपमध्ये सहभागी झाले.

ग्रुपमधील पंकज शर्मा नावाचा व्यक्ती सतत शेअरबाबत टिप्स देत होता. त्यानुसार डॉ. गुरुदासानी यांना शेअर खरेदी-विक्रीमध्ये फायदा देखील झाला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर शर्मा याने त्यांना ‘वेल्थ अलायन्य नावाचा दुसरा ग्रुप जॉइन करण्याचा सल्ला दिला. यासोबतच दिव्या भट या व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून पाठवलेल्या लिंकवरून ACT Alpha नावाचे ॲप डॉ. गुरुदासानी यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केले. याद्वारे शेअर ट्रेडिंग सुरू झाले.

सुरुवातीला ५० हजार रुपयांपासून सुरुवात करून डॉ. गुरुदासानी यांनी टप्प्याटप्याने एकूण १६ लाख रुपये गुंतवले. डॉ. गुरुदासानी यांना ४२ लाख रुपये परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. आणखी आठ लाख रुपये भरावे लागतील व एकूण एक कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल, असे सांगितल्याने त्यांना संशय आला. त्यांनी थेट खदान पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी पंकज शर्मा याच्याविरुद्ध कलम ३१८ (४) बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास करीत आहे. ऑनलाइन गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकारामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन अकोला पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.