लोकसत्ता टीम
गोंदिया : गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतीकरिता वरदान ठरलेल्या इटियाडोह प्रकल्प यंदा पावसाच्या कमतरतेमुळे काठोकाठ भरले नाही. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सांडव्यावरून पाणी वाहू लागले होते. यावर्षी मात्र ८३ टक्केच पाणी साठा असल्यामुळे त्याचा रबी हंगामातील धान पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
उंच पहाड व निसर्गाच्या कुशीत बांधलेले इटियाडोह धरण अर्जुनी मोरगाव तालुक्याचे भूषण म्हणून ओळखले जाते. १९६५ मधे माती व दगडी भरावाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या धरणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे.
या धरणातील पाण्याचा भंडारा गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. जंगले आणि पहाडांच्या मधोमध असलेला हा प्रकल्प पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचा आहे. तुडुंब भरलेल्या या प्रकल्प ला बघण्याकरीता पर्यटक गर्दी करतात. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतीला सिंचन होते.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात धरण तु़डुंब भरले होते. सांडव्यावरून देखील पाणी वाहत होते. मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाला. आत्तापर्यंत धरणात फक्त ८३ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षीच्या रबी हंगामातील पिकांच्या सिंचनावर त्याचा परिणाम होणार आहे.
आणखी वाचा- “पवार, ठाकरे यांनीच मराठा आरक्षणाला…” चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘इतिहास’ सांगितला
मासेमारीसाठी सुध्दा हे धरण प्रसिद्ध आहे. या धरणात इटियाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था रामनगरच्या माध्यमातून केज कल्चर प्रोजेक्ट धरणाच्या पाण्यात विशिष्ट साहित्याच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पिंजरा पध्दतीने मत्स्य उद्योग केले जाते. या प्रकल्पात बिज उत्पादन तयार करुन तेलापी प्रजातीची मासोळी उत्पादीत करुन विक्री केली जाते. तेलापी मासोळीची वाढ मोठी होत नसली तरी अर्धा ते दिडकिलो वजनापर्यंत वाढ होते. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असल्याने या मासोळी ची मागणी मोठी असते .
इटियाडोहच्या झिंग्याला मोठी मागणी
याच धरणात बाहेरून बिज आणून व त्यावर प्रक्रिया करुन झिंग्याचे उत्पादन सुध्दा घेतले जाते. उत्पादित केलेला झिंगा २५० ते ३०० ग्राम वजनाचा होतो.येथील झिंगा सुध्दा चविष्ट असल्याने याचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. या सोबत धरणात विविध प्रजातीचे मासेसुध्दा उपलब्ध होत असून विदर्भात या धरणातील मासोळी व झिंग्याना मोठी मागणी असते.