चारचाकी वाहनातून आलेल्या सहा ते सात जणांनी चालक व वाहकाला चाकूचा धाक दाखवून २५ टन साखर असलेला ट्रक पळविला. ही घटना आज, सोमवारी पहाटे चार वाजता दरम्यान धामणगाव मार्गावरील करळगाव घाटात वनविभागाच्या नगरवन येथे घडली. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
योगेश नानक रघुवंशी (३२, रा. मुलकी, जांबरोड), असे ट्रक चालकाचे नाव आहे. तर, दुर्गेश ढोमणे (२७, रा. चिखलीकला, जि. बैतूल) हा वाहक आहे. दोघेही बुटीबोरी येथून ट्रकमध्ये सिमेंट घेऊन मध्यप्रदेशातील बैतुल येथे गेले होते. रविवारी सायंकाळी बैतूल जिल्ह्यातील शहापूर येथून ट्रकमध्ये २५ टन साखर घेऊन यवतमाळ येथील पी.जे. राजा यांच्याकडे येत होते. शहरानजीक करळगाव घाटात वनविभागाच्या नगरवन येथे काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने ट्रकला ओव्हरटेक करीत अडविले. वाहनातून उतरलेल्या सहा ते सात जणांनी वाहकाला खाली उतरविले. दोघांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल, चालकाच्या खिशातील तीन हजार व वाहक दुर्गेशच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोघांना कारमध्ये बसण्यास सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर: अतिक्रमणाचा विळखा आता देशातील संरक्षित स्थळांनाही
दरम्यान, अंधाराचा फायदा घेत धक्का देऊन चालकाने पळ काढला. तर, आरोपींनी वाहकाला वाहनात बसवून घेऊन गेले. काही वेळाने चालक पुन्हा घटनास्थळी आला असता, ट्रक दिसला नाही. त्यामुळे चालक योगेश रघुवंशी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर काही वेळाने वाहक हा देखील पोलीस ठाण्यात पोहोचला.
सहा ते सात जणांनी चाकूच्या धाकावर रोख रक्कम, मोबाईल, ट्रक व २५ टन साखर असा एकूण २२ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. याप्रकरणी चालक रघुवंशी याच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे.