नागपूर : औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव वाढला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री कार्यालयानुसार, “नागपूरच्या महाल भागात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा.”

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरकरांना शांततेचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

चिटणीस पार्क आणि महाल भागात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दुपारी उशिरा कोतवाली आणि गणेशपेठ येथेही हिंसाचार पसरल्याची माहिती मिळाली असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहनांच्या काचा फोडल्या

काही समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली. ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली. यामध्ये सर्वाधिक नुकसान ई रिक्षाचे झाले आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळ‌विण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

आज सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिवाजी चौकाजवळ एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. यामध्ये त्यांचा दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता, घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केल्याने वाद वाढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवले. मात्र, पुढे चिटणीस पार्कच्याकडील भालदारपुरा दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या.

Story img Loader