नागपूर : अलिकडे देशात विविध ठिकाणी रेल्वेगाड्यांवर दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस सारख्या प्रिमियम गाडीवरही दगडफेक झाली होती. शुक्रवारी नागपूरजवळील कामठी रेल्वे स्थानकाबाहेर हावडा एक्सप्रेसवर दगडफेक झाली.

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर देखील दगडफेक झाली होती. कामठी परिसरात ही घटना घडली होती. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास केल्या असता काही किशोरवयीन मुलांनी गाडीवर दगडफेकल्याचे दिसून आले. त्या मुलांनी खेळताना गाडीवर दगड फेकले होते. त्यांच्या पालकांना या घटनेचे गांभीर्य सांगून प्रकरण मिटवण्यात आले होत. शुक्रवारी अहमदाबादहून कामठी स्थानकावर येत असलेल्या अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. ही गाडी कामठी स्थानकाजवळ असताना काहींनी दगड भिरकावले. अचानक दगड आल्याने नेकमे काय होत आहे हे प्रवाशांना समजले नाही. याबाबत काही प्रवाशांनी तक्रार केली. रेल्वे स्थानक काही अंतरावर असताना गाडी थांबवण्यात आली. याठिकाणी सुमारे १५ मिनिटे गाडी उभी होती. दगडफेकीमुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच गाडीचेही नुकसान झाले नाही. सर्व काही ठीक असल्याची खात्री पटल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासाला निघाली. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठले. परंतु दगडफेक करणारे पसार झाले होते.

हेही वाचा >>>एमपीएससी’तून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदावर निवड होऊनही करावे लागते सुरक्षा रक्षक, रिक्षा चालकाचे काम

अहमदाबाद एक्सप्रेवरही दगडफेक

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकावर हावाडा -अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. त्याची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. या दगडफेकीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दहा ते पंधरा जणांनी रेल्वेच्या एसी बोगीवर ही दगडफेक केली होती. काही प्रवाशी पेंट्री कारमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यामुळे दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत होते.

हेही वाचा >>>फटाक्यामुळे ७ महिला भाजल्या, नागपुरातील उमरेडमध्ये गणपती विसर्जन मरवणुकीतील दुर्घटना

 रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया

अहमदाबा-हावडा एक्सप्रेसवर कामठी स्थानकनजिक दगडफेक झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळाची पाहणी केली. सुरक्षा दलास दगडफेकीची घटना घडल्याचे आढळून आले नाही. शेजारच्या रुळांवरून धावणाऱ्या गाडीमुळे रुळाखालील गिट्टीचा तुकडा उघडण्याची शक्यता आहे, असे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

दगडफेक का केली जाते?

रेल्वेगाड्यांवर अलिकडे दगडफेकीच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये रेल्वेच्या पाहणीत विविध कारणे पुढे आली आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला मोजके थांबे आहेत. ही गाडी आपल्या गावच्या स्थानकावर थांबावी म्हणून काहींनी दगडफेक केल्याचे दिसून आले आहे. तसेच काही किशोरवयीन मुलांना विनाकारण दगडफेक केली आहे.