मनुष्यप्राण्याच्या मूत्राशयातून खडे काढण्याची शस्त्रक्रिया अर्थात मुतखडा शस्त्रक्रिया आपण ऐकतोच. मात्र, श्वानाच्या मुत्राशयातून तब्बल १०८ खडे काढण्याची अवघड शस्त्रक्रिया विक्रमी ठरावी. ही किमया वर्धेतील पशुवैद्यक डॉक्टर आणि सहकाऱ्यांनी केली. डॉक्टरांनी एका पाळीव श्वानावर शस्त्रक्रिया करीत मुत्राशयातून तब्बल १०८ खडे काढले.
मनुष्य आपले दुःख डॉक्टरांकडे मांडून त्याचे यशस्वी निवारण करतो. मात्र मुक्या जिवांची वेदना ओळखणे कठीणच. त्यामुळे उपचार करणेही अवघड ठरते. सेवाग्राम येथील रवींद्र लावणे यांची पाळीव श्वान ‘जस्सी’वर अशी व्याधी ओढवली. लघवी करताना तिला असह्य वेदना होत होत्या. ती आर्तस्वरात विव्हळत वेदना व्यक्त करू लागली. तिला पशुवैद्यक डॉ. संदीप जोगे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. ‘एक्स रे’ काढल्यावर तिच्या मूत्राशयात मोठे खडे आढळून आले. ‘ब्लॅडर स्टोन’चे निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात १०८ खडे निघण्याची बाब दुर्मिळ म्हणावी लागेल. तसेच अशी शस्त्रक्रिया प्रथमच झाली असावी, अशी शक्यता वन्यजीवप्रेमी कौस्तुभ गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शस्त्रक्रियेत रोहित दिवाने, दीप जगताप, रेश्मा गणवीर, इशा खुरपुडे यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि जस्सीला वेदनांपासून मुक्ती मिळाली. जस्सी सध्या स्वस्थ आहे.