गोंदिया :- गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत रावणवाडी बिटातील मौजा माकडी येथील शेतशिवारात विहरत असताना विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका सारस पक्षाचा मृत्यू झाला. ही घटना आज बुधवार २६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली . गोंदिया जिल्हा प्रशासनासह वन विभागद्वारे गोंदिया जिल्ह्यात सारस संवर्धनाकरिता विविध प्रयत्न केले जात असताना सुद्धा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने तर कधी विषारी खाद्य पदार्थ खाल्ल्याने सारसचे मृत्यू होत आहेत. असेच आज बुधवारी माकडी गावातील ग्रामस्थांनी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एक सारस मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती सकाळी नऊ वाजता दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सारसला पशुसंवर्धन विभाग कार्यालय गोंदिया येथे हलविण्यात आले. तिथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.
नर प्रजातीचा असून पाच महिने वयाचा होता. तो पूर्णपणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीत होता. त्याला दोन महिन्यापूर्वीच वन विभागाकडून टॅगिंग करण्यात आले होते. त्याच्या डाव्या पायात ०७७२५७ या क्रमांकाची रिंग टाकण्यात आली होती . मंगळवारी सायंकाळी सारस माकडी येथील गणपत तुरकर यांच्या शेत शिवारात फिरत असताना ग्रामस्थांनी बघितले होते. पण आज बुधवारी सकाळी तो मृत अवस्थेत आढळून आला. बुधवारी सकाळी गोंदिया येथे शव विच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुग्णांथम , उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई ,सहा. वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) अविनाश बी. मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी, गोंदिया डी. एच. कौशीक, गोंदिया तहसीलदार समशेर पठाण, मानद वन्यजीव वॉर्डन वन्यजीव तज्ज्ञ, मुकुंद धुर्वे, हिरवळ बहुउददेशिय संस्था, गोंदिया चे संचालक, रुपेश निंबार्ते, संचालक,पशुधन विकास अधिकारी, खमारी चे डॉ.राकेश गोबाडे, पशुधन विकास अधिकारी, दासगाव डॉ.अश्विनी जौलकर, कुडवा गावातील सरपंच, बाळकृष्ण लक्ष्मीचंद पटले या सर्व समिती सदस्य उपस्थितीत होते.