प्रारंभी नोकरीची गरज म्हणून आणि निवृत्तीनंतर ग्रामीण भागात रुग्णालय सुरू केल्याने डॉ. बालचंद्र खांडेकर यांचे अर्धे आयुष्य रेल्वेप्रवासात गेले आहे. रेल्वेच्या अप-डाऊनची पंचविशी साजरी करणाऱ्या खांडेकर यांचा रेल्वेगाडीशी ऋणानुबंध निर्माण झाला आहे. रोजीरोटीतून सुरू झालेला रेल्वे प्रवास त्यांना आता निवृत्तीनंतरही हवाहवासा वाटतो आहे. शासकीय रुग्णालयात विविध पदावर काम करताना त्यांची अनेक ठिकाणी बदली झाली. नोकरीचे गाव बदलेले पण रेल्वेचा प्रवास मात्र कायम राहिला.

नोकरीसाठी गरजेतून घडलेला पहिला रेल्वे प्रवास वयाची साठी ओलांडल्यानंतरही कायम आहे. याविषयी लोकसत्ताशी बोलताना डॉ. खांडेकर म्हणाले, तिरोडा, डाकराम सुकळी, दवणी वाडा आदी गावांमध्ये नोकरी करताना नागपूरहून इंटरसिटी एक्सप्रेस, रायपूर पॅसेंजरने अप-डाऊन केले. मी तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो आणि नागपूर जिल्ह्य़ातील खात येथे रुग्णालय सुरू केले. रुग्णालयात देखील सकाळच्या रायपूर पॅसेंजरने अप-डाऊन करतो. एखाद्या दिवशी रेल्वे इंजिनच्या शिटीचा आवाज आणि रेल्वे डब्यातील अप-डाऊन करणाऱ्यांची आणि प्रवाशांची गर्दी, गलबलाट ऐकू न आल्यास चुकल्या चुकल्या सारखे वाटते.

रेल्वे अप-डाऊनचे किस्से सांगताना डॉ. खांडेकर म्हणतात, कामठीहून सकाळी पावणे सात वाजता इंटरसिटी एक्सप्रेस असते. ही गाडी पकडायची म्हणजे सकाळी लवकर उठून रेल्वे स्टेशन गाठणे आवश्यक. मी नागपूरहून कामठीला जात होतो आणि तेथून इंटरसिटी पकडायचो. या गाडीला अप-डाऊन करणाऱ्यांसाठी ६ आणि ७ क्रमांकाचे डबे होते. कधी-कधी घाईगडबीत इतर डब्यात बसल्यास इतर प्रवासी नाक मुरतड असायचे आणि टी.टी.ई आम्हाला ६, ७ क्रमांकाच्या डब्यात पाठवून द्यायचे.

एवढचं नव्हे तर अनेकदा विशेषत: लग्नाच्या मोसमात गाडय़ांना गर्दी राहत असल्याने बहुतांश वेळा दारात उभे राहून प्रवास करावा लागतो. बसायला नेहमी मिळतेच असे नाही. असे असलेतरी रेल्वेगाडी शिवाय आपल्याला पर्याय नाही याची जाणीव होती. गाडी विलंबाने आली किंवा रद्द झाली की, कामाच्या ठिकाणी मुक्काम करावा लागत होता आणि मग कुटुंबाची तगमग वाढत होती. मुक्काला असल्याचे दूरध्वनीवरून कळेपर्यंत पत्नी आणि मुलं काळजीने अस्वस्थ राहत. घरी जाण्याचा बेत ऐनवेळी रद्द करणे भाग पडल्याने मी अस्वस्थ होत होतो. यावरून आमच्या सारख्या अप-डाऊन करणाऱ्यांच्या जीवनात रेल्वेगाडी किती महत्त्वाचे स्थान आहे, हे कळू शकेल. नोकरीसाठी आणि निवृत्तीनंतरही ज्या रेल्वेगाडीने मी प्रवास करतो आहे. त्या रेल्वेगाडीला मला धन्यवाद दिले पाहिजे. त्याशिवाय माझ्या कॅरिअरचा टप्पा पूर्ण होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

Story img Loader