लोकसत्ता टीम

नागपूर : मानकापूर चौकातील सिग्नलवर भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे रविवारी विचित्र अपघात घडला. ट्रकने सिग्नलवर उभ्या रुग्णवाहिकेसह तब्बल १४ वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी आठ जणांवर उपचार सुरु आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या ट्रकचालकास मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे.

रविवारी रात्री अकरा वाजता मानकापुरातील कल्पना टॉकीज चौकात सिग्नलवर जवळपास ३० वर वाहने उभी होती. याच दरम्यान भरधाव आलेल्या ट्रकने (एमएच ३४ एबी १७८१) उभ्या वाहनांना धडक दिली. यामध्ये एका शासकीय रुग्णवाहिकेसह १४ वाहने क्षतिग्रस्त झाली. या अपघातात १५ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले. काही जखमींना कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तर काहींवर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ट्रकचालक राजेंद्रसिंग याला अटक केली.

आणखी वाचा-आली रे आली, आता… गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा; दीड हजारावर गुन्हेगारांवर…

चौकात तणाव आणि पोलीस बेपत्ता

अपघात झाल्यानंतर मानकापूर पोलिसांना उशिरा माहिती मिळाली. तोपर्यंत कल्पना टॉकीज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. सुदैवाने ट्रकचालकाने पळ काढल्यामुळे अनर्थ टळला. अपघाताबाबत ठाणेदार आणि पोलीस ठाण्यात कोणतीही ठोस माहिती नव्हती. जखमींबाबत माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. मात्र, काही नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळाले.