लोकसत्ता टीम
नागपूर: हल्ली फेसबुकचा वापर सर्वच करताना दिसतात. समाजमाध्यमांचा वाढता वापर हा काहींना अंगलट आल्याच्या अनेक बातम्या आपण वाचतो. फेसबुकवर येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टने अनेकांना लाखोंनी लूटले आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे?, यापासून आपला बचाव कसा करावा यासाठी आपण काही गोष्टींची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
आपल्याला फेसबुकवर अनेकदा देखणा फोटो असलेल्या तरुण मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येते. अनोखळी असतानाही अनेकदा नवीन मित्र जोडण्याच्या मोहात ही फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याकडून स्वीकारली जाते. त्यानंतर काही वेळाने फेसबुकवरील मॅसेंजरवर संबंधित मुलीचा मॅसेज येतो. ती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मागते आणि व्हिडीओ कॉलवर अश्लिल गोष्टी करण्याचे आमंत्रणही देते. अनेकजण या मोहात पडून व्हिडीओ कॉल करतात. मात्र, हा व्हिडीओ कॉल होताच तुम्ही अश्लिल व्हीडीओ पाहता असताना तुमचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले जाते.
आणखी वाचा-अमरावती विभागात आतापर्यंत पावसाचे ३१ बळी; ९ हजारावर विस्थापित
अनेकदा तुम्हालाही अश्लिल कृत्य करण्यासाठी बोलले जाते. त्याच्या काही वेळातच या सर्व व्हिडीओ रेकॉर्डिंग तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवून नंतर तुमच्या फेसबुकमध्ये असलेल्या जवळच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली जाते. तुम्ही तात्काळ मागतील तेवढे पैसे द्या अन्यथा तुमच्या मित्रांना हे व्हिडीओ पाठवले जातील असा संदेश पाठवला जातो. तुम्ही पैसे पाठवण्यास नकार दिल्यास काही लोकांना व्हिडीओ पाठवल्याचा स्क्रीन शॉटही तुमच्या व्हॉट्सॲपवर येतो. अशा प्रकारामध्ये आतापर्यंत अनेक लोक प्रतिष्ठेसाठी पैसे देऊन फसले आहेत. त्यामुळे अशा अनोळख्या फ्रेंड रिक्वेस्ट पासून सतर्क राहणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-रिमझिम पावसाने वाशिम जिल्हा चिंब; कुठे दमदार तर कुठे तुरळक पाऊस!
फेसबुक अकाऊंट कसे सुरक्षित करावे?
फेसबुकवरील फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, यासाठी ‘सेटिंग्स अँड प्रायव्हसी’मधील सेटिंग्समध्ये जाऊन ‘हाऊ पीपल कॅन फाइंड अँड कंट्रोल यू’मध्ये जाऊन ‘हू कॅन सी युअर फ्रेंड लिस्ट’मध्ये ‘ओन्ली मी’ करावे. तसेच, आपल्या फेसबुकवरील प्रोफाइल फोटो अथवा कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्तीने कॉपी अथवा डाऊनलोड करू नये, यासाठी ‘सेटिंग्स आणि प्रायव्हसी’मधील ‘सेटिंग्स’मध्ये ‘प्रोफाइल लॉक’वर जाऊन ‘लॉक युअर प्रोफाइल’ करावे.