नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरून अधिकाऱ्यांना खडसावले, पण त्याच विमानतळावर आता भटक्या श्वानांचा वावर वाढला असून प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना तंबी देण्याची वेळ आली आहे. केवळ विमानतळच नाही तर एकूण शहरातच भटक्या श्वानांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

उपराजधानीत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून गेल्या आठ महिन्यात तब्बल पाच हजाराहून अधिक लोकांना श्वानांनी चावा घेतला आहे. .श्वानांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण असून चाव्यामुळे रेबीजचा धोकाही वाढला आहे. २०२१-२२च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये भटक्या श्वानांनी नागरिकांना चावा घेण्याच्या प्रकरणात २२ टक्क्यांनी वाढ झाली होती. महापालिकेतील रुग्णालयाच्या नोंदीनुसार २०२१-२२ या वर्षात श्वानांच्या चाव्याची सहा हजार ८०६ प्रकरणाची नोंद करण्यात आली. तर २०२२-२३ या वर्षात श्वानांच्या चाव्याची आठ हजार ७२२ प्रकरणांची नोंद करण्यात आली. दररोज शहरातील किमान २५ नागरिकांवर श्वानांचा हल्ला होत आहे. विशेषकरुन या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जात आहे. रस्त्यावरील मोकाट श्वानांना खाऊ घालणाऱ्या श्वानप्रेमी नागरिकांसाठी महापालिकेने काही नियम आखून दिले आहेत. मात्र, या नियमांचे कुठेही पालन हाेत नाही आणि महापालिकेचे देखील याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

हेही वाचा : महानिर्मितीचा पदभरती रखडलेली, दोन वर्षांपासून बेरोजगार…

मे महिन्यात एका तीन वर्षीय बालकाचा भटक्या श्वानाच्या चाव्यात मृत्यू झाला होता. तर दोन वर्षांपूर्वी शहरातील दोन डॉक्टरांना देखील श्वानांनी चावा घेतला होता. रात्री आणि पहाटेच्या सुमारास श्वानांचे हल्ले अधिक प्रमाणात होत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे धावण्यासारख्या प्रकारामुळे अपघात देखील होत आहेत. शहरातील विमानतळावर देखील भटक्या श्वानांच्या टोळ्या दिसून येतात. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला देखील याठिकाणी धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Nitin Gadkari : गडकरी म्हणाले, “आज कुणालाही आमदार म्हणून निवडून आणू शकतो, मात्र त्यावेळी सुमतीताईंना….”

नियम काय आहे

शहर व लगतच्या परिसरातील कुणीही व्यक्ती किंवा रहिवाशी मोकाट किंवा भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, इत्यादी ठिकाणी अन्न खाऊ घालणार नाही. मोकाट किंवा भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींनी स्वत:च्या घराच्या व्यतिरीक्त इतर कुठल्याही ठिकाणी अन्न खाऊ घालू नये. जर कोणी व्यक्ती मोकाट किंवा भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालण्यास इच्छुक असेल त्यांनी त्या मोकाट किंवा भटक्या कुत्र्यांना दत्तक घ्यावे, त्यांना घरी आणावे, त्यांची महानगरपालिकेमध्ये रीतसर नोंद करुन घ्यावी किंवा त्यांना ‘डॉग शेल्टर’ मध्ये ठेवावे यासह त्यांचे लसीकरण व आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयाने पारित केले आहेत.

Story img Loader