लोकसत्ता टीम
वर्धा: ग्रामीण भागातही मोकाट श्वानांचा हैदोस लोकांच्या जीवावर बेतत असल्याचे करंजी पाठोपाठ दुसरे उदाहरण पुढे आले आहे.
सेलू तालुक्यातील रेहकी गावात मुलांना या श्वानांनी भयभीत केले. घरापुढे खेळणाऱ्या एका चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तिचा चेहरा जखमी करीत श्वानाने बाजूलाच असलेल्या अंशू मानके या सात वर्षीय बालकाच्या हाताचा लचका तोडला. अनुष्का धबरडे हिच्या दंडाला चावा घेत जखमी केले. तर रोशन दिलीप सरतकर याला चावा घेतला. लगेच सिकंदर गोडघाते याच्या पायाला चावल्याने बालक चांगलाच घाबरला. परत एका बालकावर हल्ला करीत असताना लोकांनी आरडाओरड केली. श्वान पळाले, मात्र बालक पडून जखमी झाले.
गावातील लोकांनी शेवटी एकत्र येत पिसाळलेल्या श्वानाला ठार केले. जखमी बालकांवर सेलूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. भटक्या श्वानांची ही टोळी गावकऱ्यांसाठी भीतीदायक ठरत आहे.