अमरावती : रेल्वेला खासगी मालमत्ता समजून पान, तंबाखू खाऊन गाड्या, प्लॅटफॉर्म, रुळांवर थुंकण्याऱ्या तसेच कचरा करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेने कारवाईची गती वाढवली आहे. रेल्वे स्टेशन परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करताना मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यांत ७.८१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत रेल्वे स्थानक परिसरात थुकणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या एकूण ७३८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य विकार पसरण्याची मोठी भीती असते. त्याचप्रमाणे स्टेशन्सच्या स्टॉलवरून पदार्थ घेऊन प्लास्टिक रॅपर डब्यांमध्ये वा रुळांवर फेकण्यात येतात. त्यामुळे घाण पसरते. रेल्वे स्टेशन परिसरातील भिंतीही परवानगीशिवाय रंगवल्या जातात. बहुतांश प्रवाशांकडून कचराकुंडीचा उपयोग केला जात नसल्याने रेल्वेने कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना सर्वच विभागांना देण्यात आली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : मराठा मोर्चासाठी निघालात? मग वाहनतळ व्यवस्था व आचारसंहितेबाबत जाणून घ्याच…
हेही वाचा – विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
रेल्वे स्थानकांच्या परिसरातील अस्वच्छतेचे उच्चाटन करण्यासाठी रेल्वेने दंडात पाचपट वाढ करून १०० रुपयांचा दंड ५०० रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.