वर्धा : कामगारांची एकजूट व जिद्द यशस्वी ठरली. देवळी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसएमडब्लू इस्पात कंपनीत चार दिवसापासून सूरू असलेला संप मिटला आहे.कंपनी व्यवस्थापन, जिल्हा कामगार अधिकारी व देवळी पोलीस ठाणेदार यांनी चर्चा केली. संपचे नेतृत्व करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांना विश्वासात घेण्यात आले. त्यांनी मांडलेल्या सर्व अटी मंजूर करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
या कंपनीविरोधात कामगारांनी विविध आरोप केले होते. न्याय मिळत नाही म्हणून संप पुकारण्यात आला. हा संप फोडून काढण्यासाठी कामगारांना कामावरून कमी करण्याची धमकी देण्यात आली. काहींना बळाच्या आधारे कामावर घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. यामुळे रोष प्रकटला होता. संतप्त कामगारांनी कंपनीच्या बसेस अडवायला सुरवात केली.संप चिघळू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणून कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड, ठाणेदार रवींद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला.
कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक रमेश नाथ, व्यवस्थापक अनुप कुबडे, प्रकाश दूधकोहळे तर आंदोलकांतर्फे तुषार उमाळे, स्वप्नील देवतळे, जे. पी. यादव, यांच्यात वाटाघाटी झाल्यात. या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या मंजूर केल्याचे लेखी पत्र जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सर्व कामगारांनी जल्लोष करीत एकमेकांना पेढे भरविले. आंदोलक नेते उमाळे यांचा सत्कार करण्यात आला. कंपनीचे महाव्यवस्थापक श्याम मुंधडा यांचे आभार मानन्यात आले.
कंत्राटी व स्थायी कामगारांच्या मागण्या याप्रमाणे. किमान वेतन मिळावे, साप्ताहिक सुट्टी मिळावी, सक्तीने सूरू १२ तासाचे काम बंद करावे, ८ तासाचे काम असावे, भविष्य निर्वाह निधीचा घोळ संपावा, रोख नव्हे तर बँकेतून वेतन करावे अश्या व अन्य काही मागण्या होत्या. त्या सर्व मंजूर झाल्याचे तुषार उमाळे म्हणाले. कंपनी व कामगार यांच्यात चांगले संबंध रहावे म्हणून कामगारांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे तसेच कंपनी अधिकाऱ्यांनी पण सुडबुद्धी न ठेवता वागणूक द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे अतुल शेंद्रे, राहूल गजभिये, विपीन नगराळे, प्रवीण ढाले, मिलिंद ढेवले, अविश गोमासे, चारुदत्त कावळे अलोक चौधरी, अविनाश पवार, अमोल कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. हा संप अखेर मिटल्याने देवळी परिसरात शांतता प्रस्थापित झाली.