नागपूर : कंत्राटी वीज कामगार ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपावर आहेत. कामगार तुटवड्याने महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत केंद्रांमधील कोळसा हाताळणीसह इतर समस्या उद्भवल्याने मुख्य कार्यालयातील इंधन व्यवस्थापन विभागाने आयातीत कोळसा पुरवठा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. संप लांबल्यास महानिर्मितीच्या वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात सुरू असलेल्या बेमुदत संपाची झळ महानिर्मितीलाही बसणे सुरू झाले आहे. महानिर्मितीकडे पुरेसे कंत्राटी कामगार उपलब्ध नसल्यामुळे महानिर्मितीच्या विविध औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात अनेक समस्या उद्भवणे सुरू झाले आहे. त्यामुळे रेल्वे मालगाडीतून कोळसा उतरवण्याकरिता तसेच कोळशाची गुणवत्ता तपासण्यामध्ये प्रशासनाला बऱ्यात मर्यादा येत आहेत.

हेही वाचा…“फक्त संशयाच्या आधारावर माझे जीवन उद्ध्वस्त केले”, प्रा. साईबाबा यांचा आरोप

महानिर्मितीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील इंधन व्यवस्थापन विभागातर्फे विदेशातून आयात कोळसा पुरवठा तातडीने थांबवण्याचे आदेश संबंधित वीजनिर्मिती केंद्रांना दिले आहे. तूर्तास महानिर्मितीच्या बहुतांश वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाची स्थिती चांगली आहे. सोबत वेकोलिसह इतर कंपन्यांकडूनही कोळसा मिळत आहे. परंतु, संप लांबल्यास कोळसा समस्या गंभीर होऊन वीज निर्मितीवरही परिणामाचा धोका या क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहे. ‘लोकसत्ता’कडे आलेल्या तक्रारीत महानिर्मितीने कोळसा धुण्याचे काम दिलेल्या विविध खासगी कंपनीच्या वॉशरीमध्ये सध्या १७ लाख मेट्रिक टन एवढा कोळसा पडून असून हा महानिर्मितीकडे आज उपलब्ध असता तर कसलीच समस्या उद्भवली नसती, असा दावा केला आहे.

आवश्यक कोळसा उपलब्ध

महानिर्मिती प्रकल्पात सध्या १९.८ लाख मेट्रिक टन कोळसा उपलब्ध आहे. तर चंद्रपूर प्रकल्पामध्ये १६ दिवस, भुसावळ प्रकल्पात २५ दिवस, कोराडी प्रकल्पात १२ दिवसांहून जास्त दिवसांचा साठा आहे. कंत्राटी कामगारांच्या संपामुळे तूर्तास आयात होणाऱ्या कोळशाची वाहतूक थांबवली. परंतु, वेकोलिसह इतर वीजपुरवठा सुरू असल्याने वीजनिर्मितीवर काहीच परिणाम नाही. – राजेश पाटील, कार्यकारी संचालक (कोळसा), महानिर्मिती, मुंबई.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike by contract electricity workers in maharashtra disrupts coal supply to mahagenco thermal power plants mnb 82 psg