बुलढाणा: ट्रकचालकांच्या संघटनेने ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात पुकारलेला संप कायम राहिला तर एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लाखो प्रवाशांची अडचण होणार आहे.
जिल्ह्यात एकूण ७ बस आगार आहे. यामध्ये बुलढाणा, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर, शेगावचा समावेश आहे. या आगारात सात डिझेल पंप आहे. महमंडळाचा संबधित कंपनीशी करार झालेला आहे. आवश्यकतेनुसार डिझेलची मागणी व पुरवठा करण्यात येतो. दैनंदिन सरासरी ३५० फेऱ्यांसाठी ३० हजार लिटर डिझेल लागते. जिल्ह्यातील बहुतेक आगारात ३ जानेवारीपर्यंत पुरेल इतका इंधनसाठा असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे संप लांबला तर जिल्ह्यातील एसटी बस सेवा आणि प्रवासी वाहतूक ठप्प पडण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा… पेट्रोलसाठी लागल्या रांगा; यवतमाळमध्ये अनेक पेट्रोल पंप रिकामे
वाहतूकदार संघटना त्यातही चालक आक्रमक असल्याने मागणी पूर्ण होईपर्यंत संप मिटण्याची शक्यता कमीच आहे. महामार्गावर धावणारी वाहने अडवण्यात येत असल्याने ४ जानेवारीपासून एसटी जागीच खिळून राहण्याची चिन्हे आहेत.