बुलढाणा : महावितरणमध्ये देशातील अग्रगण्य उद्योगपती गौतम अदानी यांच्या शिरकाव करण्याचा प्रयत्न आणि शासनाच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ महावितरणच्या तब्बल ३२ संघटनांनी ३ तारखेच्या मध्यरात्रीपासून पुकारलेल्या तीन दिवसीय संपाची बुलढाणा जिल्ह्यालाही झळ बसली आहे. जिल्ह्यातील अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी ते तांत्रिक कामगार मिळून २ हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. यामुळे वितरण व पारेषणचे कामकाज प्रभावित झाले असून कार्यलये ओस आणि कर्मचारी रस्त्यावर, असे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.
हेही वाचा >>> संपाचा फटका, राज्यातील महानिर्मितीचे पाच वीज निर्मिती संच बंद !
हेही वाचा >>> “अदानी हटाओ, देश बचाओ!” म्हणत वीज कर्मचाऱ्यांची अदानीसह सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
जिल्ह्यातील महावितरणच्या कामकाजाचे सनियंत्रण करणाऱ्या चिखली मार्गावरील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात कृती समितीत सहभागी ३२ संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. ‘अदानी गो बॅक, खासगीकरण बंद करा, बंद करा’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला. अरुण मुळे, एस. एन. लावडे, कवीश्वर नारखेडे, अनिल बेदरकर, संजय शहाणे, दंदाळे, एस. एल. वाघ, सुनील थोरात, गणेश राणे, अण्णा जाधव, एस. जे. अवचार , धनराज इंगोले, संजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. या संपात अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कामगार सहभागी झाल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अरुण मिश्रा यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. हा संप केवळ खासगीकरणाविरोधात असून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मागण्यासाठी नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. संपाच्या पहिल्याच दिवशी केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातीलही लाखो ग्राहकांना संपाची झळ बसत आहे.