लोकसत्ता टीम
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात फिरताना सावधगिरी बाळगा. त्याला कारण गुरुवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एकदा वाघ फिरताना दिसून आला आहे. कॉलनी परिसरात फिरणाऱ्या या वाघाचा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन लगत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्र परिसरात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथे अनेकांचा बळीही गेला आहे. त्यानंतर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत पोस्टर, बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती.
आणखी वाचा-१७८ कृषी वाहिन्यांचे विलगीकरण होणार, गुणवत्तेनुसार कामासाठी…
तसेच वीज केंद्र परिसरातील झुडपी जंगल देखील साफ करण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एकदा वीज केंद्र परिसरात पट्टेदार वाघ दिसून आला आहे. हा वाघ रस्ता ओलांडून प्लांट च्या दिशेने जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याच वेळी एक मोटारसायकल स्वार आणि कार चालक तिथून जात आहे. यातील कार चालकाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. तेव्हा वीज केंद्र परिसरातून रात्री, बेरात्री जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.