लोकसत्ता टीम
बुलढाणा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतल्यावर सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे ‘ॲक्शन मोड’ वर आल्याचे चित्र आहे. सध्या मुंबईत ठाण मांडून असलेले शिंगणे मंत्रीपदासाठी सक्रिय झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्यांच्या संभाव्य लाल दिव्याला जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचा तीव्र विरोध आहे. या उप्परही त्यांची वर्णी लागलीच तर जिल्ह्यात राजकीय भडका उडणार हे उघड आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सलग दोन वेळा भेट घेतल्यावरही माजी मंत्री शिंगणे यांनी अजितदादांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर वेगवान हालचाली करीत त्यांनी कळीचा मुद्धा ठरलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या ३०० कोटींचा ‘सॉफ्ट लोन’ चा प्रस्ताव तयार करून घेतला. त्यानंतर सोमवारी ( ता. १०) अजितदादांची ‘देवगिरी’ सकाळी भेट घेऊन प्रस्ताव त्यांच्या सुपूर्द केला. संध्याकाळी ‘सत्ताधारी आमदार’च्या थाटात सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या बैठकीला हजेरी लावली.
आणखी वाचा- ‘समृद्धी’वर गस्त! बुलढाणा जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी पोलीस राहुटी, त्रुटींवर तातडीने उपाययोजना
सध्या मुंबईतच ठाण मांडून बसलेल्या शिंगणे यांनी मंत्रिपदासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. नऊ जणांचा शपथविधी झाल्याने आता अजितदादांच्या गोटाला फार तर १ कॅबिनेट व तीनेक राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंगणेंना लाल दिवा मिळणारच अशी खात्री नाही. याशिवाय धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिपद मिळाले असून आमदार इंद्रनील नाईक हे देखील इच्छुक आहेत. शिवाय मंत्रिमंडळात घ्यायचेच तर कॅबिनेट म्हणून घ्यावे लागणार आहे. यामुळे शिंगणेंच्या संभाव्य मंत्रीपदाचे चित्र आज तरी धूसर आहे.
‘हे’ नेते पुन्हा लागले कामाला
आपले राजकीय भवितव्य पणाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेलेले जिल्ह्यातील नेत्यांचा शिंगणेंना उघड विरोध आहे. यात कट्टर प्रतिस्पर्धी खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर, बुलढाणा आमदार संजय गायकवाड व सिंदखेडराजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर या नेत्यांचा समावेश आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर शरद पवार यांनी मंत्री पदच नव्हे तर शिंगणेना जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा केले. जिल्ह्यात राष्टवादीचा एकमेव आमदार असतांना ही दिलेले पालकत्व या नेत्यांच्या जिव्हारी लागले होते. तो घाव अजूनही कायम आहे. यामुळे शिंगणेंच्या हालचालींची कुणकुण लागताच हे नेते पुन्हा कामाला लागले आहे.