मागील महिन्यात झालेल्या वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेत (नीट) अपयश येईल, या भीतीने विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली. हर्षद सदू तलांडे (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याने दुसऱ्यांदा नीट दिली होती. हर्षद याने बारावी उत्तीर्ण केल्यानंतर २०२१ ला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा दिली होती.
मात्र, त्याला कमी गुण मिळाल्याने प्रवेश घेता आला नाही. म्हणून त्याने यंदा जुलैमध्ये दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली. तो १९ ऑगस्टला नागपूरहून घरी परतला. तेव्हापासून कमी गुण मिळेल या भीतीने तो तणावात होता. याच तणावातून हर्षदने मंगळवारी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले.
हेही वाचा : परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी ‘गैरहजर’; बी.ए.च्या निकालातील गोंधळ
घरच्यांना लक्षात येताच त्यांनी त्याला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास हर्षदची प्राणज्योत मालवली. मृत विद्यार्थ्याचे वडील शिक्षक असून आई ग्रामपंचायत सदस्य आहे.