नागपूर : एका विद्यार्थिनीला दहाव्या वर्गापासूनच अभ्यासाचा तणाव सहन होत नव्हता. मात्र, आईवडिलांचा सततचा तगादा मागे लागलेला होता. आता बारावीत गेल्यानंतर अभ्यासाचा ताण पुन्हा वाढला. त्यामुळे ती नैराश्यात गेली. आता शिकायचे पण नाही आणि अभ्यासही करायचा नाही, असे ठरवले आणि तिने थेट घर सोडले. ती रेल्वेस्थानकावर पोहचली आणि गुजरातकडे जाणाऱ्या उभ्या असलेल्या रेल्वेत बसली. सूरत शहरात पोहचल्यावर रेल्वेस्थानकावर कशीबशी रात्र काढली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र, भूक सहन होईना आणि कुणी मदत करेना, अशा दुहेरी संकटात सापडल्याने ती रडायला लागली. रेल्वेस्थानकावरील एका पोलीस कर्मचाऱ्याने तिची विचारपूस केली. त्यानंतर त्याने नागपूर पोलिसांना फोन करुन मुलगी सुखरुप असल्याचे कळविले. सध्या मुलीचे समूपदेशन करुन तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा…दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…

कोतवाली ठाण्यांतर्गत राहणारी रिया (बदललेले नाव) ही १२ व्या वर्गात शिकते. तिचे वडील आॅटोरिक्षा चालवितात तर आई गृहिणी आहे. रियाला दहावीपासूनच परीक्षेत कमी गुण मिळाले. त्यामुळे ती निराश होती. तिचा अभ्यासही होत नव्हता आणि परीक्षा आली की तणावात राहत होती.

सध्या ती बाराव्या वर्गात असून प्रथम सत्र परीक्षेतही तिला खूप कमी गुण मिळाले. तिचे अभ्यासातही मन लागत नव्हते. घरी आई-वडिलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते समजून घेत नव्हते. मुलीने चांगल्या गुणांनी पास व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. बारावीत पास होण्याची शक्यता नसल्यामुळे ती नैराश्यात गेली. त्यामुळे तिने थेट घर सोडून कुठेतरी निघून जाण्याचा निर्णय घेतला. तिने ११ नोव्हेंबरला सायंकाळी तिने आईला बाहेरुन सामान विकत घेऊन येत असल्याचे सांगितले आणि घर सोडले.

ती थेट रेल्वेस्थानकावर पोहचली. तिने येथे मोबाईलमधील सीमकार्ड काढून फेकले फलाट क्रमांक ८ वर उभ्या गुजरातला जाणाऱ्या रेल्वेत बसली. तिच्या डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले होते. ती गाडी कुठे जाणार हे देखील तिला माहिती नव्हते. प्रवासात तिला झोप लागली आणि जेव्हा डोळा उघडला तेव्हा ती थेट गुजरात राज्यातील सूरत रेल्वेस्थानकावर असल्याचे समजले. अनोळखी जागा, अनोळखी लोक आणि जवळ पैसेही नाहीत, अशातच पुढे काय करायचे? काय होईल? अशा विचाराने ती स्थानकावर फिरत होती.

हेही वाचा…नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…

तिला भूकही लागली होती. एक रात्र तिने रेल्वेस्थानकावर काढली. मात्र, सकाळी ती रडकुंडीला आली. काय करावे, हे तिला कळत नव्हते. त्यामुळे ती रेल्वेस्थानकावर रडत बसली. दुसरीकडे मुलगी सापडत नसल्याने आई-वडिलांनी कोतवाली ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला होता.

असा लागला शोध

सूरत रेल्वेस्थानकावर रिया रडत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्याने तिला विश्वासात घेतले आणि विचापूस केली. तिने स्वत:ची ओळख सांगितली आणि नागपूर येथून रेल्वे स्थानकावर बसल्यानंतर थेट सकाळी सूरत आल्याचे सांगितले. पोलिसाने तिची समजूत घातली आणि नागपूर पोलिसांना फोन केला. गुन्हे शाखेच्या ललिता तोडासे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याशी संवाद साधून तिला ताब्यात ठेवण्यास सांगितले. मुलीच्या वडिलांना मुलगी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली. नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिचे समूपदेशन केले. त्यानंतर तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student could not bear stress of studying she became depressed and left home adk 83 sud 02