नागपूर : शहरातील नामांकित भारतीय विद्या भवन शाळेतील तिसऱ्या वर्गाचा विद्यार्थी फुटबॉल खेळताना शाळेच्या नव्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडला. काठावर असलेला दगड त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता घडली. सारंग होमेश्वर नागपूरे (८, रा.जयताळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
सारंग नागपूरे हा कळमेश्वरजवळील आष्टी गावात असलेल्या भारतीय विद्या भवन्स शाळेत तिसरीत शिकत होता. गुरुवारी दुपारी ‘लंचब्रेक’मध्ये मुले शाळेच्या मैदानावर फुटबॉल खेळत होती. सारंग हासुद्धा त्या मैदानावर इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या एका कोपऱ्यात मित्रांसह खेळत होता. खेळताना फुटबॉल बांधकामासाठी खोदलेल्या एका खड्ड्यात पडला. त्यामध्ये पाणी होते. धावत असताना फुटबॉल खड्ड्यात पडला. सारंगही त्या खड्ड्यात पडला. त्यानंतर मुलाच्या डोक्यावर एक दगडही पडला. त्यामुळे सारंग गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. बराच वेळपर्यंत ही घटना उजेडात आली नाही. शेवटी मुलांनी शाळेतील स्टाफरुममध्ये बसलेल्या शिक्षकांना घटनेबाबत माहिती दिली. शिक्षक धावतच खड्ड्याकडे गेले. तोपर्यंत बराच उशिर झाला होता. बेशुद्धावस्थेत सारंगला नागपुरातील एलेक्सीस रुग्णालयात दाखल केले. त्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही वाचा >>> वीरशैव लिंगायत समाज धर्मगुरूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी…
अन्य विद्यार्थ्यांमध्ये दहशत
मैदानावर खेळणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी सारंगला खड्ड्यातून काढताना बघितले होते. त्यानंतर सारंगचा मृत्यू झाल्याची माहिती भवन्समधील शाळेतील अन्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली. त्यामुळे अनेक विद्यार्थी दहशतीत आले. तसेच या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सारंगच्या मृत्युमुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
कोणताही शिक्षक उपस्थित नव्हता
मैदानावर मुले खेळत असताना कोणताही शिक्षक उपस्थित नव्हता तसेच खोदलेल्या खड्ड्यापासून संरक्षण व्हावे, अशी कोणतीही काळजी शाळा प्रशासनाने घेतली नाही. मुलाला उपचार मिळण्यासही उशिर झाला. त्यामुळे आमच्या मुलाच्या मृत्यूस शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपी सारंगच्या कुटुंबियांनी लावला आहे. तर शाळा व्यवस्थापनाने ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.