अकोला : टिप्पर काळ बनून आला आणि महाविद्यालयातून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला जबर धडक दिली. विद्यार्थ्याने हेल्मेट परिधान केले होते, तरी तो चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अकोला शहरातील मलकापूर परिसरातील महामार्गाच्या पुलाजवळ घडली. या प्रकरणात खदान पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> नागपूर : ‘एचआयव्ही’ग्रस्त सात वर्षीय मुलाची ‘थॅलेसेमिया’वर मात
मलकापूर परिसरातील दीपाली नगरात राहणारा भावेश नरेंद्र खवले (१६) हा विद्यार्थी महाविद्यालयातून घरी जात होता. मलकापुरातील पुलाच्या खाली भरधाव येणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच ३० बीडी १६१६) त्याला जबर धडक दिली. डोक्यात हेल्मेट होते. मात्र, टिप्परची चाके त्याच्या डोक्यावरून गेल्याने हेल्मेटचे दोन तुकडे झाले आणि भावेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांसह रुग्णवाहिका चालकाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणला. मलकापूरकडे जाणारा मार्ग खड्डेमय झाला आहे. सोबतच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अवजड वाहतूक बंद करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.