गोंदिया : जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मरामजोब येथील ११ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. चुलीजवळ बसून अभ्यास करीत असताना लागलेल्या आगीत ती गंभीररित्या होरपळली होती. ही घटना शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ ला पहाटे ५:३० वाजताच्यादरम्यान घडली. चांदणी किशोर शहारे (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी ही शिवराम महाविद्यालय मुरदोली ता. देवरी येथील अकराव्या वर्गामध्ये शिकत होती. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि पहाटेच्या सुमारास थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्याकरिता चुलीजवळ बसून ती अभ्यास करीत होती. दरम्यान अचानक लागलेल्या आगीत चांदणी जळाली. गंभीर अवस्थेत तिला प्रथमत: जवळील ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. नंतर गोंदियाला हलविण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने तिला नागपूरला हलवण्यात आले. नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान आज शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चांदणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूपश्चात आई-वडील, भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे.
हेही वाचा >>>चार दुर्मिळ चांदी अस्वलांचा मृत्यू, जंगलाला लागून असलेल्या मार्गावरील वाहतूक ठरतेय कर्दनकाळ
मोकाट श्वानाचा हैदोस, आठ नागरिकांना चावा
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे शुक्रवारी आठवडी बाजारात एका मोकाट श्वानाने तब्बल आठ जणांना चावा घेतला. यानंतर सौंदड ग्राम पंचायत प्रशासनाने तत्काळ त्या श्वानाला ठार मारले. यामुळे गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चावा घेतलेल्यांपैकी पाच जणांना तातडीने सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना टीटीचे इंजेक्शन व एक लस दिली. लस उपलब्ध नसल्याने एका रुग्णाला गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, तर काहींना जवळील साकोली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले गेले. जखमींमध्ये हिराबाई माणिक गिऱ्हपुंजे (४९, रा. उमरी), धन्नू शोभा गिरी (४५, रा. सौंदड), महादेव कारू नागरीकर (७४, रा. परसोडी), सूरजलाल सोमाजी शहारे (६५, रा. सौंदड), शोभा यादवराव वंजारी (९०, रा. सौंदड) यांचा समावेश आहे.