नागपूर: शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमधील एक प्राध्यापक कायम मानसिक छळ करत असल्याची निनावी तक्रार एका विद्यार्थिनीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे केली. याचा आधार घेत अभाविपने विज्ञान संस्थेमध्ये आंदोलन करत संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, संबंधित विद्यार्थिनीची महाविद्यालयाकडे किंवा तेथील विशाखा समितीकडे कुठलीही तक्रार नाही. निनावी तक्रार आणि अभाविपच्या आंदोलनाच्या दबावामुळे उच्च शिक्षण सहसंचालकांनी संबंधित प्राध्यापकाला निलंबित करावे असे पत्र शिक्षण संचालकांना पाठवले आहे.
महाराजबाग चौक परिसरातील शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमधील एका प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार अभाविपकडे करण्यात आली. या निनावी तक्रारीचा आधार घेत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विज्ञान संस्थेमध्ये आंदोलन केले. तसेच तात्काळ संबंधित प्राध्यापकाला निलंबित करावे अशी मागणी केली. यावर शिक्षण सहसंचालक डॉ. चव्हाण यांनी उच्च शिक्षण संचालकांना पत्र पाठवले. त्यात संबंधित प्राध्यापकाला निलंबित करावे. त्यांच्यावर सक्तीच्या रजेची कारवाई करावी. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी मागणी पत्रात करण्यात आली.
निनावी तक्रारीत काय?
महाविद्यालयातील एक प्राध्यापक न्याय सहाय्यक क्षेत्रात तुम्हाला करिअरच्या चांगल्या संधी नाही असे सांगतात. तसेच अभ्यासक्रमातील विषय शिकवणे सोडून अन्य गोष्टी करत राहतात. विद्यार्थी हे चांगल्या शिक्षणाच्या अपेक्षेने येथे प्रवेश घेतात. मात्र, प्राध्यापकांच्या अशा वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
संबंधित विद्यार्थिनीची तक्रार ही आमच्याकडे आलेली नाही. विशाखा समितीकडेही तक्रार करण्यात आलेली नाही. अशी कुठलीही तक्रार संस्थेकडे आलीच नसल्याने आम्ही कुठलीही कारवाई करू शकलेलो नाही.- प्रा.डॉ. अंजली रहाटगावकर, संचालक, शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था.