लोकसत्ता टीम
गडचिरोली: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान सोमवारी त्यांनी दामरंचा आणि ग्यारापत्ती या अतिसंवेदनशील गावांना भेटी दिल्या. यावेळी ग्यारापत्ती येथील विद्यार्थिनींनी फडणवीस यांना विशेष विनंती केली, ती ऐकून सर्वांनीच त्यांच्या विनंतीला दाद दिली. तर फडणवीस यांनी सुध्दा त्यांची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
सोमवारी कोरची तालुक्यातील नक्षलग्रस्त ग्यारापत्ती पोलीस मदत केंद्रातील नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनजागरण मेळावा सुध्दा ठेवण्यात आला होता. पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून गावातील नागरीक सकाळपासूनच आकाशाकडे नजरा लाऊन बसले होते. अखेर संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर ग्यारापत्ती गावात उतरले.
आणखी वाचा- ताडोबात सफारीदरम्यान पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
जनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत विविध योजनांचा लाभ फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. सोबतच साहित्य व विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी फडणवीस यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी देखील आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
पण गर्दीतून काही विद्यार्थिनी पुढे येत आम्हाला शाळेत जाण्यासाठी एसटी बस हवी, कोरोनानंतर दोन वर्षांपासून गावात बस आली नाही. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जावे लागते. पण बस नसल्याने शिक्षणात खंड पडत आहे, असे सांगितले. त्यांचे म्हणणे एकूण घेत फडणवीस यांनी मागणी लवकरच निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.