अकोला: अकोला शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. बारावी व नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्याने अकोल्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. किरकोळ कारणावरून वर्ग मित्राने दिलेली पोलीस तक्रार व त्यातून पोलिसांच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या पालकांनी केला. प्रसन्न वानखडे (वय १७, मूळ रा. बेळगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

अकोला शहरात मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. याच प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातील प्रसन्न वानखडे हा विद्यार्थी शिक्षणासाठी अकोल्यात राहत होता. इतर विद्यार्थ्यांसह जलाराम अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये तो भाड्याने राहायचा. इयत्ता बारावीतील प्रसन्न नीट परीक्षेची तयारी करीत होता. तो तोष्णीवाल लेआऊट परिसरातील एका नामांकित कोचिंग क्लासचा विद्यार्थी होता. शुक्रवारी रात्री त्याने गळफास घेऊन राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. अभ्यासाच्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. गेल्या महिन्यात प्रसन्नचा इतर एका विद्यार्थ्याशी वाद झाला होता. या प्रकरणात सिव्हिल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रसन्नविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान उपनिरीक्षकासह दोन पोलिसांनी प्रकरणातून सुटका करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी विद्यार्थ्याकडे केली होती. त्यामुळे तणावात येऊन आपल्या पाल्याने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणात आता कुणावर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या आहेत. किरकोळ वादाच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिल्यामुळे विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी पत्र दिले.

पालकमंत्र्यांचे चौकशीचे निर्देश

जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सुद्धा विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले आहेत.

Story img Loader