राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एमकेसीएल’कडून परीक्षेचे काम काढून घेतले असले तरी विद्यापीठाच्या अडचणी मात्र थांबलेल्या नाहीत. विद्यापीठाकडे आता विद्यार्थ्यांची माहिती(डेटा) नसल्याने महाविद्यालयांनी पुन्हा एकदा संपूर्ण माहिती भरून परीक्षा विभागाला द्यावी अशा सूचना केल्या आहेत. मात्र, प्राचार्य फोरमने याला कडाडून विरोध केला असून विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा महाविद्यालयांना का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचा- नागपूर : प्रवाशांची अव्वाच्या सव्वा भाडे आकारून लूट; उपराजधानीत ऑटोरिक्षांचे ‘मीटर डाऊन’
कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘एमकेसीएल’ला परीक्षेचे काम देण्याचा केलेला अट्टाहास आता विद्यापीठाच्या अडचणी वाढवत आहे. निकालामध्ये झालेल्या गोंधळामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘एमकेसीएल’कडून काम काढून घेण्याच्या सूचना विद्यापीठाला दिल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठाने कामही काढून घेतले. मात्र, ‘एमकेसीएल’ने त्यांच्याकडे असलेली विद्यार्थ्यांची माहिती न दिल्याने आता प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने माहितीसाठी पुन्हा महाविद्यालयांना विनंती केली आहे.
हेही वाचा- नागपूर : बाळविक्रीसाठी तोतया डॉक्टरांची टोळी; रुग्णालये, परिचारिकाही बनावट
यासाठी सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून पुन्हा सर्व माहिती पाठवण्यास सांगितले आहे. मात्र, महाविद्यालयांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महाविद्यालयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही सगळी माहिती विद्यापीठाला आधीच पाठवली आहे. मात्र, ही माहिती एमकेसीएल कंपनीकडे होती. विद्यापीठाने हे काम हिसकावून घेतल्यानंतर कंपनीने विद्यार्थ्यांची सर्व माहिती दिली नाही. प्राचार्य फोरमने आता माहिती भरून देण्यास विरोध केला आहे.
हेही वाचा- नागपूर: काळय़ा बिबटय़ाची शिकार; नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील प्रकार
संघटनेचे सचिव डॉ. आर.जी. टाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयांनी उमेदवारांची सर्व माहिती विद्यापीठाला दिली होती. ही माहिती भरणे खूप अवघड काम आहे. महाविद्यालयांमध्ये मर्यादित कर्मचारी असूनही त्यांनी मेहनत घेतली. मात्र, आता ‘एमकेसीएल’मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आमची कसरत केली जात आहे. विद्यापीठाने पुन्हा महाविद्यालयांचे काम वाढवण्याऐवजी ‘एमकेसीएल’ कंपनीशी संपर्क साधून ही माहिती घ्यावी.