लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : इयत्‍ता बारावीच्‍या परीक्षेत अनुत्‍तीर्ण होण्‍याचा धोका टाळण्‍यासाठी आपल्‍या जागी दुसऱ्याला परीक्षेस बसविण्याचा डाव विद्यार्थ्याच्या चांगलाच अंगलट आला. या प्रकरणी दोष सिद्ध झाल्यामुळे येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (क्रमांक (५) न्यायालयाने दोषी विद्यार्थ्याला तीन महिन्यांचा कारावास तसेच पाचशे रुपये दंड ठोठावला.

नादिर उल्ला खान नुरुल्ला खान (२३, रा. चिलम छावणी, अमरावती) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. विधी सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २६ सप्‍टेंबर २०१४ रोजी नादीर उल्‍ला याचा बारावीचा मराठी विषयाचा पेपर होता. परीक्षेसाठी त्‍याला शहरातील इंदिराबाई मेघे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्‍यात आले होते. परीक्षा सुरू झाल्‍यानंतर केंद्रावरील पर्यवेक्षिका सुमा गावंडे यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्‍यांच्‍या ओळखपत्रांची तपासणी केली. त्‍यावेळी नादिर उल्‍ला याच्‍या बैठक क्रमांकाच्‍या जागी अन्‍य अल्‍पवयीन मुलगा परीक्षा देण्‍यासाठी बसलेला असल्‍याचे लक्षात आले. त्‍यांनी मुलाची चौकशी केली. नादिर उल्‍ला यानेच आपल्‍याला परीक्षा देण्‍यासाठी पाठविल्‍याचे या मुलाने सांगितले.

आणखी वाचा-कुणबी समाजाचा सरकारविरोधात एल्गार! सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा

या प्रकरणी तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्‍यात नादिर उल्‍ला याच्‍या विरोधात परीक्षेदरम्‍यान होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास गाडगेनगरचे तत्‍कालीन पोलीस उपनिरीक्षक गोकूल ठाकूर यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्‍यायालयात दाखल केले. या प्रकरणी नादिर उल्‍ला याच्‍याविरूद्ध दोष सिद्ध झाल्‍याने त्याला तीन महिने सक्‍तमजुरी तसेच पाचशे रुपये दंडाची शिक्षा न्‍यायालयाने सुनावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student making someone else appear in the exam in his place now forced labour mma 73 mrj