नागपूर : पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) जनरल मेडिसीन विषयात प्रवेशासाठी एका विद्यार्थिनीने अपार कष्ट केले. मात्र, अपरिहार्य कारणास्तव थोडक्यात कोलकाताला जाणारे विमान हुकल्यामुळे ती मूळ कागदपत्रांसह दिलेल्या कालावधीत उपस्थित राहू शकली नाही. एम्स प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यावर विनंती करूनही त्यांनी असहकार्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाद मागितली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी मुलीची गुणवत्ता आणि अपरिहार्य परिस्थिती लक्षात घेता एम्समधील तिच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला.
काय घडले होते?
कल्याणी विजय चक्रावार, असे या याचिकाकर्त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याचिकेनुसार, याचिकाकर्ती ही सध्या नागपूरच्या एम्सच्या रेडिओ डायग्नोस्टिक्स शाखेत पदव्युत्तर (एमडी) तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिकते. एम्स, नवी दिल्ली दरवर्षी पश्चिम बंगाल येथील कल्याणीसह देशभरातील विविध एम्स संस्थांमध्ये एमडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयएनआय-सीईटी परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा विद्यार्थीनीने दिली होती. या परीक्षेत तिने देशात गुणवत्ता यादीत ११९ क्रमांक प्राप्त केला. १९ डिसेंबर २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या समुपदेशन आणि ऑनलाइन सीट वाटपाच्या पहिल्या फेरीत अनारक्षित श्रेणीतील अत्यंत मागणी असलेल्या जनरल मेडिसिन स्पेशलायझेशनसाठी पश्चिम बंगालच्या कल्याणी एम्स येथे विद्यार्थिनीचा नंबर लागला. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रांसह प्रत्यक्ष सादर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगाल येथे २४ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अवधी देण्यात आला होता. १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर या अत्यंत कमी कालावधीमध्ये याचिकाकर्तीला डिमांड ड्राफ्ट देखील तयार करायचा होता. त्यामुळे, तिने २३ डिसेंबर रोजी बँकेचा व्यवहार पूर्ण करीत २४ डिसेंबरचे सकाळी ७.३० वाजताचे नागपूर ते कलकत्ता विमानाचे तिकीट बुक केले होते. उच्च न्यायालयाने याप्रकरणी मानवी दृष्टिकोन बाळगून ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत विद्यार्थिनीचे नाव समाविष्ट करण्याचे निर्देश एम्स प्रशासनाला दिले. याचिकाकर्तीच्यावतीने ॲड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा >>>महाराष्ट्राच्या सीमेवरील या शहरात सर्वाधिक थंडी…पारा तब्बल…
घट्ट मिठी व अश्रूंचा पूर
कल्याणी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्गातून येते. करोना काळात तिने वडील गमावल्याने आई एकटी तिचे संगोपन करते. मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने फार धडपड केली. न्यायालयाने मुलीच्या बाजूने निर्णय देताच आईने न्यायालयातच मुलीला घट्ट मिठी मारली. यादरम्यान दोघांच्याही डोळ्यात अश्रूंचा पूर बघायला मिळाला. या प्रकरणामुळे अतिशय कठोर असणारे न्यायालय परिसर काही काळापुरते भावनिक झाले होते.