Student molestation case Akola : जिल्ह्यातील काजीखेड जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणात उरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक केली. या प्रकरणाची तक्रार तीन दिवसांपूर्वीच १७ ऑगस्टला ‘चाईल्ड हेल्पलाईन’कडे ‘टोल फ्रि’ करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याने कारवाईला तीन दिवसांचा विलंब लागल्याची माहिती आहे. दरम्यान, समितीने प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप भाजप आमदार वसंत खंडेलवाल यांनी केला.
बदलापूर येथे शाळेत दोन मुलींवर लैगिंक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. बदलापूर प्रकरणामुळे राज्य पेटलेले असतानाच अकोला जिल्ह्यातूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षकानेच सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील चित्रफित दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केला. शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने हे गैरकृत्य केले. त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकावर विद्यार्थिनींनी केला. या शिक्षकाने उन्हाळ्यामध्ये शिकवणी वर्गाच्या नावावर देखील विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता. विद्यार्थिनींनी शाळेतील एका शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. त्यांच्या भ्रमणध्वनीवरूनच ‘चाईल्ड हेल्पलाईन’वर संपर्क साधत १७ ऑगस्टला ही माहिती देण्यात आली. मात्र, तक्रार देण्यास कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शाळा गाठून जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. एका विद्यार्थिनीने समितीच्या सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर सहा विद्यार्थिनींसोबत नराधम शिक्षकाने हे कृत्य केल्याचे समोर आले. तक्रारदार समोर आल्याने उरळ पोलिसांकडे धाव घेण्यात आली. पालकांनी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी मंगळवारी रात्री शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ‘चाईल्ड हेल्पलाईन’शी संपर्क केल्यानंतरही गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात तीन दिवसांचा कालावधी गेला.
समितीने तक्रार गांभीर्याने घेतली नाही – आमदार वसंत खंडेलवाल
पीडित विद्यार्थिनीने तीन दिवसांपूर्वी समितीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. ती तक्रार समितीने गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप भाजप आमदार वसंत खंडेलवाल यांनी केला. काल रात्री जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार यांच्याशी संपर्क साधून तक्रारीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक झाली. या प्रकरणात आणखी पीडित विद्यार्थिनी आहेत का? या दृष्टीने देखील तपास होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आमदार वसंत खंडेलवाल यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.