लोकसत्ता टीम

अकोला : नियतीपुढे कुणाचे काहीही चालत नाही. काळ, वेळही कुणासाठी थांबत नसल्याचा जीवनात पदोपदी अनुभव येत असतोच. दहावीची परीक्षा देऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याला आपल्या जीवनात पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही नव्हती. परीक्षेच्या दिवशीच वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचा दुःखद प्रसंग विद्यार्थ्यावर ओढवला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावरही वडिलांच्या चितेला अग्नी देऊन विद्यार्थ्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. मात्र, परीक्षेची नियोजित वेळ होऊन गेली होती. अखेर विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर न देताच घरी परतावे लागले. अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड गावात घडलेल्या या दुःखद प्रसंगामुळे अनेकांना गहिवरून आले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्षांपासून तयारी करतात. मात्र, ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती किंवा दुःखद घटनेमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला देखील मुकावे लागते. अशाच प्रकारची एक घटना अकोला जिल्ह्यात शुक्रवारी घडली आहे. जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील रायखेड या गावात दिलीप समाधान नवलकार (४२) हे पहाटे फिरण्यासाठी मित्रासोबत गेले होते. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या मित्राने त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पेंदाम यांनी तपासणी केल्यानंतर दिलीप नवलकार यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नवलकार कुटुंबीयांवर अचानक दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांचा मुलगा विकास नवलकार याचा दहावीच्या पहिला पेपर काही तासांवर आला होता. वडिलांच्या चितेला विकासने मुखाग्नी दिला.

पितृछत्र हरपल्याचे दुःख बाजूला ठेवून या परिस्थितीतही विकासने परीक्षा देण्यासाठी थेट केंद्र गाठले. विकास परीक्षा केंद्रावर गेल्यावर त्याने केंद्र प्रमुख व उपस्थित शिक्षकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. परीक्षेची वेळ होऊन गेली होती. तरीही विकासला पेपरला बसू देण्यासाठी केंद्रावरील शिक्षकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांनाही यश आले नाही. अखेर विकासला परीक्षा न देताच केंद्रावरून माघारी फिरावे लागले. वडिलांच्या निधनाचे डोंगराएवढे दुःख असतानाही दहावीची परीक्षा देण्याची विकासची इच्छा अपूर्णच राहिली.

Story img Loader