नागपूर : आरोग्य विभाग, टीईटी अशा संगणकाधारित परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा अनुभव पाठीशी असतानाही पारदर्शी परीक्षेसाठी विश्वास असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला स्पर्धा परीक्षार्थीच्या काही संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयोगातर्फे  सरळसेवा भरतीसाठी चाळणी परीक्षा संगणकाधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ४० संवर्गाची चाळणी परीक्षा होणार असून यामुळे परीक्षा प्रक्रिया वेगवान होऊ शकेल, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.

आतापर्यंत विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरती प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र, त्यामध्ये बदल करून संगणकाधारित पद्धतीने घेण्यात येणार आहे. या निर्णयाला आता विरोध होत आहे.

आरोग्य विभाग, टीईटी परीक्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोग्य विभागाची परीक्षाही रद्द करावी लागली. त्यामुळे संगणकाधारित पद्धतीने एमपीएससीने परीक्षा घेतल्यास गैरप्रकार होण्याची भीती स्पर्धा परीक्षार्थीकडून व्यक्त करण्यात येते. होतकरू विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याने पारदर्शी परीक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एमपीएससीने अशा पद्धतीने परीक्षा घेऊ नये, अशी मागणी होत आहे.

समन्वय समिती आक्रमक..

आयोगाच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा विरोध आहे. अशा पद्धतीच्या परीक्षांतील अनेक घोटाळे उघड केले आहेत.  त्यामुळे खासगी कंपन्यांवर विश्वास नाही. त्यामुळे हा निर्णय आयोगाने मागे घ्यावा, असे मत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे आहे.

खासगी कंपनीमुळे धोका..

सरळसेवा भरती चाळणी परीक्षा संगणकाधारित घेतल्यास त्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक करावी लागेल.  संगणकाधारित परीक्षा घेण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आयोगाकडे नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी पुन्हा खासगी कंपनी आल्यास गैरप्रकार होऊ शकतो, अशी शंका स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने व्यक्त केली.