नागपूर : पहिल्यांदा दहावीत नापास झाल्यानंतर पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये नापास होण्याची भीती होती. त्यामुळे विद्यार्थ्याने बसस्थानकावरच विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील कुही बसस्थानकावर घडली. आर्यन विजय लुटे (१७, रा. आकोली, ता. कुही) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन लुटे हा कुही शहरातील एका नामांकित विद्यालयाचा विद्यार्थी होता. गेल्या वर्षी मार्च २०२४ च्या परीक्षेत तो नापास झाला होता. शासनाच्या नियमानुसार ‘एटीकेटी’ नियमानुसार त्याने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अकरावीत प्रवेश घेतला होता. परंतु, त्यासाठी दोन परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विषयात पास होणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने तो सप्टेंबर महिन्यातील पूरक परीक्षेस बसला होता. परंतु, पेपरच्या दिवशी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याचा इतर गावांशी व उमरेडसारख्या शहराशी संपर्क तुटला होता. त्यामुळे आर्यन उमरेडला परीक्षेसाठी जाऊ शकला नव्हता. अभ्यास होऊनही केवळ पावसामुळे परीक्षा केंद्रावर पोहचता न आल्यामुळे आर्यन पुन्हा नापास झाला. त्यामुळे नैराश्यात गेला होता. आता त्याच्याकडे असलेल्या शेवटच्या संधीत दोन्ही विषयात उत्तीर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो खूप अभ्यास करीत होता. मात्र, अभ्यास होऊ शकला नाही. इंग्रजी विषयाची मनात भीती निर्माण झाली आणि नापास होण्याच्या चिंतेमुळे तो तणावात वावरत होता.
शनिवारी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. अभ्यास न झाल्याने व आपण उत्तीर्ण होणार नाही, या भीतीने धान्यात सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे विषारी द्रव्य प्राशन केले. बसस्थानकावरच काही वेळाने तो बेशुद्ध पडला. हा प्रकार त्याच्या वर्गमित्राच्या लक्षात आला. त्याने आर्यनच्या वडिलांना फोन करुन माहिती दिली. तोपर्यंत आर्यनला ग्रामीण रुग्णालय, कुही येथे भरती केले. माहिती मिळताच त्याचे वडील आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहचले. तिथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल रुग्णालयात रवाना केले.
नागपूर मेडिकल रुग्णालयात पोहोचताच त्याचा मृत्यू झाला. कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू आहे.आर्यन लुटे नावाचा विद्यार्थी कुही बसस्थानकावर बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो परीक्षेमुळे तणावात होता. नापास होण्याच्या भीतीमुळे त्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. भानुदास पिदूरकर (ठाणेदार, कुही)