नागपूर : तुकडोजी चौक ते मानेवाडा चौकादरम्यान असलेल्या कॅरिस्मा शाळेचे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेची वाट धरतात. वर्दळीच्या मानेवाडा सिमेंट रोडवरील भरधाव वाहनांमुळे येथे विद्यार्थ्यांवर अपघाताची टांगती तलवार असते.
मानेवाडा सिमेंट रोडवरील ताजनगरात कॅरिस्मा प्राथमिक व माध्यमिक शाळा आहे. इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत एक हजारावर मुले-मुली शिक्षण घेतात. शाळेचे प्रवेशद्वार रस्त्याच्या अगदी पाच फुटांवर आहे. तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा सिमेंट रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. त्यावर कुठेच गतिरोधक नाही. त्यामुळे तुकडोजी चौकातील सिग्नल पार करणारी वाहने भरधाव वेगाने पुढे जातात. त्यामुळे कॅरिस्मा शाळेच्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडावा लागतो. अनेक विद्यार्थी शाळेत सायकलने येतात. त्यांना वाहनांची धडक बसण्याची नेहमीच भीती असते. या शाळेच्या समोर मोकळी जागा नसल्यामुळे थेट सिमेंट रस्त्यावरून शाळेत जावे लागते.
हेही वाचा >>>मिठाई, जाम, जेली, कँडीसाठी वापरले जाणारे ‘जिलेटीन’ आता बॉयलर कोंबडीच्या वेस्टपासून बनणार…
मानेवाडा चौकाकडून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे शिक्षकांसह पालकही घाबरलेले असतात. मुले शाळेत प्रवेश करेपर्यंत पालक शाळेच्या बाजूला उभे असतात. तसेच शिक्षकही काळजीपोटी विद्यार्थ्यांना आत घेण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभे असतात.
सभागृह आणि किराणा मॉलमुळे वर्दळ
कॅरिस्मा शाळेला लागून एक मंगलकार्यालय आणि गृहउपयोगी वस्तूंचा मॉल आहे. त्यामुळे शाळेसमोर ग्राहक आणि मंगल कार्यालयात कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची नेहमी गर्दी असते. त्यांची वाहनेसुद्धा शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच उभी केली जाते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होते.
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांचा त्रास
मानेवाडा ते तुकडोजी चौक रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुकडोची चौकाकडून येणाऱ्यांना सिद्धेश्वर सभागृहाला फेरा मारून शाळेत जावे लागते. हे अंतर अधिक आहे. त्यामुळे मुलांना दुचाकीने सोडून देणारे पालक आणि व्हॅनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत शाळेत पोहचतात व स्वतःसह मुलांचाही जीव धोक्यात घालतात.
हेही वाचा >>>आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
कारचालकांचे म्हणणे काय?
मानेवाडा सिमेंट रोडवर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची गस्त नेहमीसाठी असायला हवी. शाळा सुटण्याच्या वेळेस वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केल्यास संभाव्य अपघाताचा धोका टाळता येईल, असे कारचालक विनोद लुटे यांनी सुचवले.
पोलिसांचे म्हणणे काय?
वाहतुकीच्या नियोजनासाठी तुकडोजी चौकात पोलीस कर्मचारी नेहमीसाठी तैनात असतात. मानेवाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही वाहतूक पोलिसांच्या गस्ती वाहनाची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही सतर्क आहोत, असे वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी सांगितले.