लोकसत्ता टीम

बुलढाणा: सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनेच सैन्यात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवत गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केल्याचा प्रकार मेहकर येथे उघडकीस आला आहे.

सैन्यात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल १ कोटी ३४ लाख रुपयांचा गंडा विदर्भासह मराठवाड्यातील पालकांना घालण्यात आला आहे. यावर कळस म्हणजे, जीजामाता करिअर अकॅडमी या नावाने सैन्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या संचालकानेच ही फसवणूक केली आहे. कमीअधिक साडेचार वर्षांपासून चालढकल करणाऱ्या संचालकांविरुद्ध एका विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा- १०० वर्षे जुन्या विद्यापीठात १९ विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही, शिक्षक दिनाचे वास्तव

४० विद्यार्थ्यांकडून तब्बल १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये लुटले आहेत. प्रदीप एकनाथ खिल्लारे( राहणार नगर परिषद शाळा क्रमांक पाच जवळ ,मेहकर जिल्हा बुलढाणा) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या मुख्य भामट्यासह त्याची पत्नी पूजा प्रदीप खिल्लारे, आरोपीचा भाऊ प्रशांत एकनाथ खिल्लारे ,वडील एकनाथ रंगनाथ खिल्लारे, आई रत्नमाला एकनाथ खिल्लारे या ५ जणांचाही या फसवणुकीत सहभाग असल्याने त्यांच्या विरुद्धही पोलिसांनी कारवाई केली आहे. या सर्व आरोपीं विरोधात मेहकर पोलिसांनी भारतीय दंड विधान अंतर्गत सन १८६० कायद्याच्या कलम ४२०, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

एकाचे चाळीस

जिकुल्ला शेख गुलाब (वय २५, राहणार वॉर्ड क्रमांक १७, मिलिंद नगर, मेहकर) याने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्याची स्वतः १ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे. ‘तुझी ग्राउंडची तयारी चांगली आहे, मी तुला आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो त्यासाठी तुला ४ लाख रुपये द्यावे लागतील’ असे जीजामाता करिअर अकॅडमीचा संचालक प्रदीप खिल्लारे याने जिकुल्ला याला सांगितले होते. त्यावेळी त्याने १ लाख २० हजार रुपये प्रदीप खिल्लारे याला दिले होते. ही घटना कोरोना आधीची आहे.

आणखी वाचा-दीक्षाभूमीला कोणत्या नियमाच्या अंतर्गत जमीन देता येईल? उच्च न्यायालयाची विचारणा…

कोरोनामुळे प्रशिक्षण बंद होते. कोरोना संपल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाल्यावर जिकुल्ला शेख याने प्रदीप खरात याला नोकरी बाबत विचारणा केली. त्यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेव तुला ‘डायरेक्ट ऑर्डर’ येईल असे प्रदीप खरात म्हणाला होता. मात्र त्यानंतर जिकुल्ला शेख याला कालांतराने धक्कादायक माहिती पडली. प्रदीप खरात याने अशाच पद्धतीने सांगून आणि सैन्यात नोकरीचे आमिष दाखवून आपल्या सोबतच्या अनेकांना गंडविले. तब्बल ४० जणांकडून पैसे उकळले असल्याचे त्याला समजले.

सैनिक तर नाही फसवणूक झाली

५ डिसेंबर २०१९ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यानच्या कालावधीत खिल्लारेने ४० सामान्य परिस्थितीतील विद्यार्थी आणि पालकांना गंडविले.मात्र सैन्य तर झालो नाही पण ‘फसवल्या’ गेलो ,कष्टाचे पैसे गमावून बसलो याची जाणीव झाल्यावर अखेर चाळीस जण भानावर आले . संचालक ‘अट्रोसिटी’ दाखल करण्याची धमकी देत होते .मात्र जिकुल्ला शेख गुलाब याने हिम्मत करीत आज तक्रार दिली.त्यात त्याने स्वतःसह इतर चाळीस जणांच्या नावाचा आणि दिलेल्या पैशाचा उल्लेख देखील केला आहे. ४० जणांकडून उकळण्यात आलेल्या रकमेची एकूण बेरीज १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी प्रदीप खरात याला अटक केली.

आणखी वाचा-गणेशोत्सवात ‘पीओपी’ मूर्ती नकोच, थेट उत्पादकांवर कारवाई…

औरंगाबाद, हिंगोली…

दरम्यान गंडविण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्येने मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र यात वाशीम जिख्यातील काहींचा सुद्धा समावेश आहे. एवढेच नव्हे तर मराठवाडा मधील सुद्धा विधार्थी आहेत. अभिषेक म्हस्के हा खरवड जिल्हा हिंगोली, आरिफ आयुब कुरेशी हा अंबड जिल्हा जालना, मंगेश पैठणे, पवन दुबे हे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तपासात आणि पोलीस कोठडीत खिल्लारे कंपनीचे आणखी कारनामे पुढे येणार आहे.