नागपूर : परीक्षा देण्यासाठी याआधी उमेदवारांना तीन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्यात बदल होऊन परीक्षा देण्यासाठी तीन संधींवरून दोन संधी देण्यात येणार असल्यामुळे आधीच नाराज झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक निराशाजनक माहिती समोर आली आहे. आयआयटी कानपूरच्या आयोजक संस्थेने घेतलेल्या निर्णयामुळे २०२३ मध्ये १२वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स्ड या परीक्षेला बसू शकणार नाहीत. यापूर्वी या विद्यार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आयआयटी कानपूरने ही संधी दिल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी जेईई-मेनसाठी अर्ज केले होते. पुन्हा एकदा आयआयटीमध्ये प्रवेशाची तयारी सुरू केली होती. मात्र, आता या विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. दरम्यान, आयआयटी कानपूरने अलीकडेच एक अधिसूचना प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये जेईई ॲडव्हान्स्डमध्ये बसण्याच्या संधींची संख्या दोनवरून तीन करण्यात आली होती, मात्र आता हा निर्णय संयुक्त प्रवेश मंडळाच्या बैठकीनंतर रद्द करण्यात आला आहे. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) २०२५ साठी पात्रता नियम सुधारित केले आहेत. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत, बोर्डाने असे म्हटले होते की जेईई मेन उत्तीर्ण उमेदवार जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला तीन वेळा उपस्थित राहू शकतात, परंतु आता हा नियम मागे घेण्यात आला आहे. आता उमेदवार प्रगत परीक्षेला फक्त दोनदा बसू शकतात. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, विविध स्पर्धात्मक गरजा लक्षात घेऊन, जुना नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पूर्वीचे पात्रता नियम जे २०१३ पासून लागू होते, ते पुनर्संचयित केले गेले आहेत.
हेही वाचा…सिंदखेडराजा, मेहकरला मिळाले नवीन नेतृत्व! तीन दशकानंतर…
किती आहे जेईई ॲडव्हान्स्डसाठी वयोमर्यादा?
जेईई ॲडव्हान्स्ड २०२५ परीक्षेत बसण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देखील आहे. या उमेदवारांचा जन्म १ ऑक्टोबर १९९५ किंवा त्यानंतर झालेला असावा. जेईई मेन्स परीक्षेत अव्वल क्रमांक मिळविणारे २.५० लाख उमेदवार प्रगत परीक्षेला बसले आहेत. नवीन नियमांनुसार ज्या विद्यार्थ्यांनी आयआयटीमध्ये प्रवेश घेतला आहे. ते जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेला दोनदा बसू शकत नाहीत, परंतु एनआयटीमध्ये प्रवेश घेतलेले उमेदवार हे करू शकतात. ते परीक्षा देऊ शकतात.