नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र अनेकदा त्यांचे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलेले आहेत. अशीच काहीशी घटना सध्या राज्यात घडली आहे. राज्य शासनाने यापुढे अनेक विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी चीड निर्माण झाली आहे. त्यातच आता अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च हा प्रचंड असून इतक्या पगारात खासगी कंपनीमध्ये तीन-चार कर्मचारी दर्जेदार काम करू शकतात, असे वक्तव्य केल्याने सरकार शासकीय पदभरतीसाठी इच्छुक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
हेही वाचा >>> रेल्वेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अतिरिक्त १५ कोटी २६ लाख का मोजले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शासकीय नोकर भरतीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या त्रिकुटाला पुढच्या निवडणुकीत घरी बसवा, असे आव्हान ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
“हुजूर, आम्ही मजूर बनायला तयार नाहीत”
आत्ता कुठे आम्ही हुजुरांसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. वेठबिगारी रद्द झालेली आहे. अजित पवार यांचे वित्तमंत्र्याचे काम एखाद्या खासगी एजन्सीला द्यावे. कारण, त्यांचा ताफा, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांवर होणारा खर्च जास्त आहे. या खर्चात वित्त मंत्री आणि इतर ४ मंत्र्यांचा खर्च पूर्ण करता येईल. – उमेश कोर्राम – स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.