नागपूर : आर्थिक, सामाजिक व अन्य कारणांनी पारंपरिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकत नसलेल्या किंवा अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील उच्च शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र, विद्यापीठाने शैक्षणिक शुल्कामध्ये दुप्पट वाढ करून दूरशिक्षणाची दारे बंद केल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढ केलेली आहे. बी.ए. प्रथम व बी.कॉम. प्रथम वर्षांचे शैक्षणिक शुल्क १७०२ रुपयांवरून २९८८ रुपये करण्यात आले आहे. ही वाढ ७५ टक्के आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांहून जास्त विद्यार्थी हे बी.ए. आणि बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे याच अभ्यासक्रमांमध्ये मुक्त विद्यापीठाने नेमकी ७५ टक्के शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ केल्याने पारंपरिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ न शकणारे गरीब विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. यासोबत बी.एस्सी. अभ्यासक्रमात ५५ टक्के, डीसीएमच्या अभ्यासक्रमात ३५ टक्के, एम.ए. अभ्यासक्रमात ३६ टक्के अशी जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात फार मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, मुक्त विद्यापीठाच्या तिजोरीत १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. असे असतानाही शैक्षणिक शुल्कात निर्दयीपणे वाढ करून विद्यार्थ्यांवर भुर्दंड लावण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

वंचित राहिलेल्या समाजाच्या घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम न करता त्यांना प्रवाहात येऊ न देण्याचे पाप विद्यापीठ का करते हे कळायला मार्ग नाही. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असणारे विद्यापीठ ‘ज्ञानगंगा श्रीमंताच्या घरी’ होण्याच्या दृष्टीने वाटचाल तर करत नाही, असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे ही शुल्कवाढ तात्काळ कमी करावी. – प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी सदस्य, विद्वत परिषद मुक्त विद्यापीठ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students fear to be deprived of higher education due to double increase in tuition fee of open university amy
Show comments