लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ: जिल्हा परिषद शाळांमधील दर्जाबाबत कायमच नकारात्मक मत समाजात व्यक्त होतात. मात्र शिक्षकांनी ठरविले तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळाही शहरी भागातील खासगी शाळांपेक्षाही काकणभर सरसच राहू शकतात, याची प्रचिती राज्याच्या शिक्षण आयुक्तांना कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आली. या शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणितीय कौशल्य व येथील बचत बँकेचा उपक्रम बघून शिक्षण आयुक्त सूरज मांढरे चाट पडले. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील काही उपक्रमशील शाळांना नुकतीच भेट दिली. तेव्हा अनेक उपक्रम बघून समाधान व्यक्त केले.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-24-at-12.35.29-PM.mp4

सुकळी शाळेतील पहिली, दुसरीतील विद्यार्थी चक्क चार हजारपर्यंत रोमन संख्या वाचू, लिहू शकतात, हे शिक्षकांनी आयुक्त मांढरे यांना सांगितले. तेव्हा त्यांचाही विश्वास बसला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना, ‘तुम्हाला रोमन संख्या वाचायला व लिहायला येते का’, असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तेव्हा आयुक्तांनी विद्यार्थ्यांकडून याची खातरजमा करून घेण्यासाठी त्यांना रोमन संख्या वाचायला, लिहायला लावली. पहिल्या वर्गातील धनंजय सतीश जाधव याने संख्या लेखनास सुरुवात केली. सर्वप्रथम देवनागरी लिपीत, नंतर आंतरराष्ट्रीय लिपीत व त्यानंतर मराठी व इंग्रजी अक्षरांत आणि शेवटी रोमन चिन्हात संख्या लिहून दाखविली. तेव्हा आयुक्तांसह उपस्थितही आश्चर्यचकीत झाले.

हेही वाचा… वर्धा: बाजार समित्यांच्या निवडणुका ठरल्या राजकीय कुटुंबातील वारसदारांच्या अभिषेकाची संधी; दिग्गजांची मुले रिंगणात

सुकळी शाळेत मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि सहायक शिक्षक संदीप कोल्हे यांनी विविध उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात आणि व्यवहार ज्ञानातही मोलाची भर घातली आहे. भाषा आणि गणितीय कौशल्यात ही शाळा जिल्ह्यात अव्वल आहे. अनेक गावकऱ्यांनी तालुक्यातील शाळेतून मुलांची नावं काढून त्यांना सुकळीतील जिल्हा परिषद शाळेत टाकले आहे, हे विशेष.

हेही वाचा… संजय राऊत यांच्या सरकार पडण्याच्या भविष्यवाणीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारला धोका नाही, मात्र..”

‘आनंदी मुलांची बचत बँक’

शाळेच्या आवारात पाय ठेवताच या शाळेचे वेगळेपण नजरेत भरते. छोट्या गावातील छोटी शाळा असली तरी या शाळेची कीर्ती आता राज्यभर पसरली आहे. शाळेतील ‘आनंदी मुलांची बचत बँक’ हा उपक्रम तर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनाही भावला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेचे बँकिंग कामकाज समजून घेतले. मुले खाऊचे पैसे या बँकेत जमा करतात. प्रत्येकाचे स्वतंत्र पासबुक आहे. विद्यार्थीच या बँकेत रोखपाल, व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळतात. येथे विद्यार्थ्यांचे ग्राहकभांडारही आहे. येथे बँकेप्रमाणे सर्व व्यवहार होतात. विद्यार्थी गरजेनुसार पैसे काढून शैक्षणिक साहित्यही खरेदी करतात. आयुक्तांना विद्यार्थ्यांनी ही सर्व कार्यपद्धती समजावून सांगितली.

तेव्हा आयुक्तांनी बँकेच्या सभासदत्वाचा अर्ज भरून शाळेतील विद्यार्थ्यांच्या बचत बँकेत आपले खातेच उघडले. त्यात शंभर रूपये जमाही केले. विद्यार्थी व्यवस्थापकाने त्यांना पावती व पासबुकही दिले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यवहार कळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याने राज्यातील शाळांमध्ये तो राबविण्याचे संकेत यावेळी आयुक्त मांढरे यांनी दिले.

गावकऱ्यांचे कौतुक

कोणत्याही बदलासाठी ग्रामीण भागात शिक्षकांना गावकऱ्यांची साथ मोलाची असते. सुकळी (ता. कळंब), तिवसा (ता. यवतमाळ) या शाळांमध्ये भेटीदरम्यान आयुक्त मांढरे यांना गावकऱ्यांचा सहभाग हिरीरीने आढळला. तिवसा येथे गावकऱ्यांनी शाळेसाठी जमीन दान दिली, ही मोठी गोष्ट आहे. गावकऱ्यांच्या पुढाकारातूनच ग्रामीण भागातील शाळेत हे बदल होत असल्याचे नमूद करून त्यांनी गावकऱ्यांचेही कौतूक केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students in 1st write roman numerals up to 4000 as well as the education commissioner is fascinated by the transactions in anandi childrens savings bank nrp 78 dvr