गोंदिया : राज्य शासनाने नुकताच मराठी शाळा दत्तक देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयावरून आता विरोधात निरनिराळ्या मार्मिक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खासगी कंपन्यांचे घर भरण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप तर होतच आहे. त्यातच आता देवरीच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. त्यात आमच्या खाऊचे पैसे घ्या, पण आमची शाळा आम्हाला परत द्या, अशी आर्त साद घातली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळा काही खासगी कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला. एकीकडे अनावश्यक बाबींवर वारेमाप खर्च करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिक्षणासारखा मूलभूत हक्क हिरावून घेण्याचे कारस्थान करण्यात येत आहे.

हेही वाचा – “सरकारने आता युवकांचे परीक्षा शुल्कही परत करावे”, विरोधी पक्षनेत्यांची मागणी

हेही वाचा – बुलढाणा : एकाच शाळेच्या ११ विद्यार्थिनी राज्य स्पर्धेत; जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नव्या विक्रमाची नोंद

सरकारला शाळा चालविण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी खाऊ करिता असलेले पैसे सरकारला देतील. मात्र, त्या शाळा खासगी उद्योजकांच्या हातात देऊ नका. यानंतरदेखील शासनाचे डोळे उघडत नसतील आणि त्यांनी शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा चंग बांधलाच असेल तर मग संपूर्ण सरकारच खासगी कंपनीला चालविण्यासाठी देऊन टाका, असा संतप्त रोष देवरी येथील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविल्या निवेदनातून व्यक्त केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of deori protested against the adoption school scheme sar 75 ssb