नागपूर : शहरातील नामांकित जे.एन. टाटा पारसी शाळा गजबजलेल्या शनिवार बाजाराच्या रस्त्यावर आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थिनी नेहमी वाहतुकीच्या कोंडीत अडकून पडतात. या रस्त्यावरुन कॉटन मार्केट, शनिवारी बाजार-फुले मार्केटकडे जाणाऱ्या जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहचणे अडचणीचे ठरत आहे.
गंजीपेठ-गांधीसागरच्या बाजूला जे.एन. टाटा पारसी मुलींची शाळा असून जवळपास ३ हजारांवर मुली शिक्षण घेतात. दोन इमारतींमध्ये असलेल्या या शाळेला एका पुलाने जोडलेले आहे. नर्सरी ते बारावीपर्यंत असलेल्या टाटा पारसी शाळा अगदी वर्दळीच्या रस्त्यावर आहे. शाळेसमोरून शनिवार बाजार ते चिटणीस पार्क चौकाकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्यामुळे जड वाहने नेहमी या रस्त्यावरून भरधाव जात असतात. शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच गांधीसागर (शुक्रवारी) तलाव असल्यामुळे तेथे नेहमी वृद्ध, मजूरवर्ग आणि युवावर्गाची मोठी गर्दी असते. शाळेला दोन प्रवेशद्वार असले तरी दोन्ही प्रवेशद्वार मुख्य रस्त्यापासून १० फुटांच्या अंतरावर आहेत.
दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेला विद्यार्थिनींची मोठी गर्दी रस्त्यावर होते. शाळेला बससेवा नसल्यामुळे मुलींना घेण्यासाठी पालकांची रस्त्यावर गर्दी होते. विद्यार्थिनींना घेण्यासाठी आलेल्या स्कूलव्हॅन, ऑटो आणि पालकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे शाळेसमोर मोठी वाहतुकीची कोंडी होती. शाळेत विद्यार्थिनींसाठी सायकली-दुचाकी ठेवायला पुरेसी जागा नाही तसेच शाळेला पुरेसे पटांगणही नाही, त्यामुळे मुली शाळा सुटल्यानंतर रस्त्यावरच गर्दी करतात. प्रवाशांची वाहतूक करणारे ऑटो-ई रिक्षासुद्धा शाळेसमोरच प्रवाशांची चढ-उतार करतात. तसेच शाळेसमोरच प्रवाशांची वाट बघत ऑटो उभे ठेवतात. त्यामुळे सुद्धा वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.
गर्दी आणि किलबिलाट
टाटा पारसी शाळेसमोरील रस्त्यावर शनिवारी बाजार भरतो तर इतर दिवशी लहान दुकानदार-विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करतात. या रस्त्यावर नागरिकांचीही मोठी वर्दळ असल्यामुळे गर्दी आणि किलबिलाट नेहमी असतो. शाळेला लागून दोन मंदिरे असून दर्शनासाठी येणाऱ्यांच्या वाहनांनी शाळेच्या बाजूचा रस्ता व्यापला जातो. या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची फारसी गस्त नसते. रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे.
हातठेल्यांचा विळखा
चहा विक्रेते, आईसक्रीम विक्रेते व हातठेल्यावर भाजीपाला किंवा बाजारातील वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी टाटा पारसी शाळेला विळखा घातला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणाकडे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. हातठेल्याच्या विळख्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थिनीसुद्धा नेहमी वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वेळेवर शाळेत पोहचू शकत नसल्याची ओरड आहे.
गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणामुळे अर्ध्याच रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर वाहतूक कोंडी होते. पालकांनी व वाहतूक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अन्यथा अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. -अरुण राऊत, पालक
बाजारपेठकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील गजबजलेल्या परिसरात शाळा असल्यामुळे वाहतूक पोलिसांची नेहमी गस्त ठेवण्यात आली आहे. रस्त्यावर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असते. शाळा सुटण्याच्या वेळेत हा रस्ता मोकळा असावा, असा आमचा प्रयत्न असतो. -माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग