नागपूर : महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) कायद्यामध्ये बदल करून नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णयाविरोधात राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आक्रमक झाले आहे. सोमवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. आक्रमक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.
राज्यात पशु, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायात अधिक प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे कारण देत खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यासंदर्भात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ मध्ये सुधारणा करण्यात आली. राज्यात पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यप्राप्त पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे कायमस्वरूपी विनाअनुदानित खासगी महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती, असा दाखला सरकारने दिला आहे.
हेही वाचा >>>नागपुरातील मेडिकल रुग्णालयात अद्ययावत ८० खाटांचे ‘पेईंग वार्ड ‘; रुग्णांना अतिरिक्त पैसे देऊन सेवा मिळणार
हेही वाचा >>>मानसिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी समाज माध्यमाचा आधार; आरोग्य विभाग डॉक्टरांना करणार मार्गदर्शन
सध्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत १० महाविद्यालयांमध्ये ५५७ पदवी आणि २१६ पदव्युत्तर प्रवेशाची क्षमता आहे. विद्यापीठामध्ये इयत्ता बारावीच्या इंग्रजी विषयांतर्गत पशुवैद्यकीय विज्ञान विषयातील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम अर्थात डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स सुरू करण्याची योजना आखली जात आहे. याला राज्यभरातील पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विरोध आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, प्रस्तावित नवीन पदविका अभ्यासक्रमामुळे बोगस डॉक्टर तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.