नागपूर: नागपुरात वैद्यकीय अभासक्रमाशी संबंधित विद्यार्थी डेंग्यू आणि इतर आजाराच्या विळख्यात आहे. मेडिकलशी संलग्नित बीएस्सी नर्सिंगमध्ये शिकणारी एक मुलगी डेंग्यूने अतिदक्षता विभागात उपचार घेत असतांनाच शासकीय दंत महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यालाही डेंग्यूने विळख्यात घेतले आहे. तर मेडिकल परिसरात बरेच विद्यार्थी आजारी पडत असल्याचे खुद्द विद्यार्थी सांगत आहे.
नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचे ५० रुग्ण आढळले आहे. संशयित मृत्यू देखील आहे. मात्र मृत्यू विश्लेषण समितीने डेंग्यूचे मृत्यू असे शिक्कामोर्तब केल्यानंतरच अधिकृत मृत्यू घोषित केला जातो. जिल्ह्यातील ५० रुग्णांमध्ये शहरातील ३० आणि ग्रामीणमधील २० रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूच्या बहुसंख्य रुग्णांमध्ये विश्रांती, भरपूर पाणी, द्रवपदार्थाचे सेवन, ताप, डोकेदुखी – अंगदुखी यावर पॅरासिटॅमॉलची एक ते दीड गोळी आठवा इतर औषधी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने घेण्याची गरज आहे. वेळीच काळजी घेतल्यास साधा डेंग्यू सहज बरा होतो. परंतु आजार गंभीर झाल्यास मृत्यूची जोखीम वाढते. पावसाळ्यातही लोकांच्या घरातील कुलर अद्यापही सुरू आहे. परिणामी, डासांचा प्रादुर्भाव वाढतो. यातून डेंग्यूच्या डासांची पैदास वाढते. मेडिकल परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहेत. झुडपी जंगल आहे, येथे कधीही कीटकनाशक फवारणी होत नाही. साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे डासांचे प्रमाण वाढते.