वाशिम : जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या ८२ जागांसाठी १ हजार ९४५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. व लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतला आहे. नियमित अभ्यास करणारे व इतर परीक्षेत ७० टक्के गुण घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत कमी गुण कसे, असा त्यांचा आरोप आहे.
महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ८२ कोतवाल पदासाठी रविवार ३० जुलै रोजी परीक्षा घेतली. परीक्षेला १ हजार ९४५ अर्ज आले होते. परीक्षा संपताच केवळ दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, निकाल जाहीर होताच अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. नियमित अभ्यास करणारे व शासनाच्या विविध परीक्षेत ७० टक्के घेणाऱ्यांना कोतवाल परीक्षेत अत्यंत कमी गुण कसे मिळाले. तसेच जाहीर केलेले गुण व सोडविलेल्या गुणाची पडताळणी केली असता. त्यामध्ये तफावत झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
आज ३१ जुलै रोजी अनेक विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी यांना देण्यासाठी गेले असता, त्यांनी मालेगाव तहसीलदार यांना भेटा, असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांत नाराजी व्यक्त केली जात असून नव्याने गुणाची तपासणी करावी, उत्तर पत्रिका तपासावी, तोपर्यंत सदर भरतीचा निकाल राखून ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.