प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देऊन त्यांची शाळेतील उपस्थिती नियमित करण्याचा हेतू आहे. आता नवा हेतू ठेवण्यात आला आहे. सध्या या आहारात तांदळापासून बनलेल्या पाककृतीच्या स्वरूपात लाभ मिळतो. आता नाविन्यपूर्ण उपक्रम आला. नियमित आहार देतानाच अतिरिक्त पूरक पौष्टिक आहार मुलांना द्यावा, असे प्राथमिक शिक्षण विभागास वाटते. कृषी विभागानेही तशी विनंती केली आहे.
अंडी उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ मिळण्यासाठी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेत अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषी खात्याने केली. उच्च प्रथिने, उष्मांक, जीवनसत्वे, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट अंड्यात असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांची वाढ चांगली होईल. रोगप्रतिकार शक्ती वाढेल. या भावनेने नियमित आहार देतानाच अंडी, केळी पोषण आहारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
आणखी वाचा-नागपूर : पतंगांच्या नादात २२ जण रुग्णालयात! नायलॉन मांजाचा वापर सुरूच
आठवड्यातून एक दिवस अंडी मिळतील. अग्रिम अनुदान म्हणून या जानेवारीत प्रतिविद्यार्थी प्रतिआठवडा एका अंड्यामागे पाच रुपये लागू झाले आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करावी. बुधवार किंवा शुक्रवारी उकळलेले अंडे, अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणी या स्वरूपात द्यावे. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून द्यायचे आहे. याची अंमलबजावणी पात्र शाळेतून नियमित होईल, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना घ्यायची आहे. या उपक्रमाची जनजागृती विविध माध्यमातून करण्याची सूचना आहे. विद्यार्थ्यांना लाभ दिला मात्र त्याची नोंद पोर्टलवर केली नसल्यास त्याचे अनुदान मिळणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित वाटप होत आहे अथवा नाही, याची खातरजमा वारंवार भेट देऊन करायची आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नियमित पौष्टिक आहार व सोबतच अंडा बिर्याणीही मिळणार आहे.