गोंदिया : अनेक दिवसांपासून सावरी गावातील जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट व सडलेला पोषण आहार माध्यान्ह भोजन म्हणून शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मात्र, आता सदर पोषण आहार सर्वप्रथम कंत्राटदार व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या पाल्यांना खाऊ घालून दाखवावे त्यानंतरच आम्ही आपल्या मुलांना आहार खाऊ घालू, अशी भूमिका गोंदिया तालुक्यातील सावरी येथील पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतली आहे. तशी माहिती त्यांनी शुक्रवारी ( २३) शाळेच्या प्रांगणात घेतलेल्या पत्र परिषदेतून दिली आहे.

मागच्या अनेक महिन्यापासून येथील जिल्हा परिषदेच्या मुले व मुलींच्या शाळेत निकृष्ट पोषण आहार पुरवण्यात येत आहे. त्यात मिरची पावडर, मोहरी, जिरे व वाटाणा हे साहित्य अगदी सडलेले पुरवण्यात आले आहे. या प्रकाराची माहिती शिक्षण व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाला दिली. परंतु, विभागाकडून यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सर्व पालकांनी बुधवार (२१)पासून पोषण आहारावर बहिष्कार घातला आहे हे विशेष.मागच्या तीन दिवसांपासून एकही विद्यार्थी शाळेत मध्यान्ह भोजन करीत नाही. कारवाई होत नसल्यामुळे अखेर शुक्रवारी(२३) हा सर्व प्रकार प्रसार माध्यमांच्या उपस्थित सर्व निकृष्ट साहित्य उघड करण्यात आले. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार गावकऱ्यांनी चव्हाट्यावर आणला.

हेही वाचा : चंद्रपुरात ‘रिफायनरी’ लावण्याचा विचार नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचे चोवीस तासातच घूमजाव

सदर पोषण आहार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी सर्वप्रथम आपल्या मुलांना खाऊ घालावे त्यानंतरच आम्ही शाळेत हा पोषण आहार आपल्या मुलांना खाऊ घालू अशी भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने व पालकांनी पत्र परिषदेत मांडली आहे. आता यावर शिक्षण विभाग कोणती भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढेच नव्हे तर येथे मुलींच्या शाळेत सात वर्ग असून सुद्धा या ठिकाणी केवळ चार शिक्षक कार्यरत आहे. पत्रपरिषदेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोकचंद मस्करे (मुली),शिंधुबाई पटले(मुले),प. स. सदस्या सरला चिखलोंढे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष चंदन पटले, माजी सरपंच नरेंद्र चिखलोंढे, टेकचंद सिहारे,ग्रा. प. सदस्य उमाशंकर तुरकर, लिकेश चिखलोंढे, संजय शेंडे, बंशीपाल दमाहे, संगीता उके, गीताताई मंडीया,तसेचशाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader