नागपूर : नागपुरात गेल्या महिन्याभरातील ३७ हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर मेडिकलच्या श्वसन, फुफ्फुस व निद्रारोग विभागाने अभ्यास केला. त्यात रक्तदाब, मधुमेहासह इतर जोखमीतील रुग्णांना भयावह स्वप्न पडत असल्यास हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असल्याचे पुढे आले. १५ मार्चला जागतिक निद्रारोग दिवस असून त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि त्याच्या अखत्यारित सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील हृदयरोग विभागात हे सर्व रुग्ण उपचारासाठी आले होते. अभ्यासात २५ रुग्णांना सुमारे एक महिन्यादरम्यान एक वा अनेकदा भयावह स्वप्न आले होते. एकूण रुग्णांपैकी ८ रुग्णांना पहाटे ४ ते ६ वाजता दरम्यान तर इतर २९ रुग्णांना दिवसा हृदयविकाराचा झटका आला होता.

हेही वाचा…बच्‍चू कडूंकडून महायुतीत मिठाचा खडा?

हृदयविकाराचा झटका दिवसा आलेल्या २९ रुग्णांपैकी १८ रुग्णांना एक महिन्याच्या आत भयावह स्वप्नाचा इतिहास आहे. हे प्रमाण ६२ टक्के आहे. तर पहाटे हृदयविकाराचा झटका आलेल्या ८ रुग्णांपैकी ७ रुग्णांना भयावह स्वप्न आल्याचा इतिहास आहे. हे प्रमाण ८७ टक्के आहे. एकूण रुग्णांपैकी ७२ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, ४० टक्केंना मधुमेह, १८ टक्केंना धूम्रपान, २४ टक्केंना मद्यपान, २८ टक्केंना तंबाखूचे व्यसन होते.

पिटर्सबर्ग स्लिप प्रश्नावलीच्या अभ्यासानुसार ३७ पैकी २९ रुग्णांना (७८ टक्के) गुणवत्तापूर्ण झोप नसल्याचा इतिहास होता. त्यात ७१ टक्के पुरुष आणि ८८ टक्के महिलांचा समावेश होता. त्यामुळे एकंदरीत प्राथमिक अभ्यासानुसार रक्तदाब, मधुमेहासह इतरही जोखमीचे आजार असलेल्या व गुणवत्तापूर्ण झोप न होणाऱ्या रुग्णाला भयावह स्वप्न येत असल्यास त्याला हृदयविकाराचा धोका जास्त राहत असल्याचे पुढे येत असल्याचे प्रा. डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.

हेही वाचा…‘सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत…’ खळबळजनक आरोपाबाबत जाणून घ्या सविस्तर

प्रत्येकाने रोज ठरवलेल्या वेळेवर झोपावे आणि उठावे, झोपेच्या ६ तास आधी चहा, कॉफी किंवा उत्तेजित करणारे पेय घेऊ नये, रोज ४ तास आधी खूप मसालेदार किंवा गोड जेवण करू नये. झोपेपूर्वी हलके जेवणच करावे, बिछाना तसेच झोपेची खोली आरामदायी व हवेशीर असावी, आवाज किंवा उजेडामुळे झोप मोडणार नाही याची काळजी घ्यावी. रोज सकाळी व्यायामासह आहारावर लक्ष द्यावे.– प्रा. डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, श्वसन, फुफ्फुस व निद्रारोग विभाग, मेडिकल रुग्णालय, नागपूर.

हेही वाचा…मुनगंटीवारांसमोर पक्षातील विरोधकांशी जुळवून घेण्याचे आव्हान

अपुऱ्या झोपेचे परिणाम

अपुऱ्या झोपेमुळे एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होते, हात-डोळा समन्वय साधण्यास अडथळा येणे, चिडचिडेपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो, कमजोर प्रतिकारशक्ती, नैराश्य, चिंता, वजन वाढणे आदी समस्या जाणवतात.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study links nightmares or bad dreams to increased heart disease risk in patients with high bp and diabetes health conditions mnb 82 psg