यवतमाळ – रेती तस्कर आणि महसूल, पोलीस विभागाचे ‘हितसंबंध’ सर्वश्रृत आहे. त्यामुळे रेती तस्करांवर कधीच कठोर कारवाई होत नाही. परंतु, एखादा दबंग अधिकारी अशा हितसंबंधाची पर्वा न करता, बेधडक कारवाई करतो, तेव्हा तो ‘नायक’ ठरतो. राळेगाव येथील उपविभागीय अधिकारी विशाल खत्री सध्या असेच डॅशिंग अधिकारी म्हणून नावारूपास येत आहेत.
आपलेच अधिकारी, कर्मचारी रेती तस्करांवर कारवाई करत नसल्याचे बघून एसडीओ खत्री हे वेषांतर करून, मजूर म्हणून रेती घाटावर पोहोचले. आपल्या यंत्रणेतील कोणालाही भनक न लागू देता ते काही वेळ घाटावर वावरले, सर्व निरीक्षण नोंदविले. घाटावरून रेती भरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सात ट्रॅक्टरवर स्वत: जोखीम पत्करून कारवाई करत, हे ट्रॅक्टर जप्त केले. राळेगाव तालुक्यातील वडकी नजीक झुल्लर शिवारातील वर्धा नदीपात्रात ही कारवाई करण्यात आली. महसूल, पोलीस विभागाने रेती घाटांवर कारवाईची योजना आखल्यानंतर ती पूर्णत्वास जाण्याआधीच माहिती रेती तस्करांपर्यंत पोहोचत आणि कारवाई फसते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी खत्री यांनी कोणालाही आपल्या योजनेबद्दल माहिती न देता ते स्वत:च खासगी वाहन घेवून रस्ता बदलून वडकी येथे पोहोचले. तेथे एका तलाठ्यास काही काम असल्याचे सांगून त्याच्या दुचाकीवरून रेती घाटाच्या अलिकडे पोहोचले. तेथे एका कोतवालास बोलावून तेथून तिघेजण तीन किमी पायी चालत गेले.
मार्गात रेती तस्करी करताना एक ट्रॅक्टर आढळला. त्याच्यावर कारवाई करून त्याच ट्रॅक्टरमध्ये बसून मजुराच्या वेषात झुल्लर शिवारातील रेती घाटावर पोहोचले. तेथे ट्रॅक्टरमध्ये बसूनच अर्धा तास संपूर्ण टेळाहणी केली. रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळले. त्यांनीच एका चालकाला एसडीओ धाड टाकणार असल्याची माहिती मोबाईलवरून दिली. सर्वांची पळापळ सुरू होताच तेथेच असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वांना इशारा देत सात ट्रॅक्टर ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती देत त्यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सर्व ट्रॅक्टर जप्त करत पोलीस ठाण्यात आणले. पसार झालेले तीन ट्रॅक्टर जमा झाले पाहिजे, अशी कडक सूचना मंडळ अधिकारी दिलीच चिडे आणि तलाठी गिरीश खडसे यांना दिली. त्यांनी रेती तस्करांशी संपर्क साधून पसार झालेले ट्रॅक्टर चार तासांत पोलीस ठाण्यात जमा केले. या प्रकरणी महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीवरून कुणाल ठाकरे, दिनेश काळे, ब्रह्मानंद कोरडे, विनोद देवकर, कुणाल शिंदे, स्वप्नील महल्ले, इमरान खॉ पठाण, स्वप्नील खंडाळकर, हेमंत वाभिटकर आदी रेती तस्कर ट्रॅक्टर मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.