चंद्रपूर : बहुजन, दलित, मुस्लिम समाजाची गठ्ठा मते, मोदी विरोधी लाट तथा राज्य व केंद्र सरकारच्या फोडाफोडीचे राजकारणाला कंटाळलेले मतदार अशा विविध कारणांनी या लोकसभा मतदार संघात प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र त्यांच्या या विजयाचे खरे व मुख्य सूत्रधार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यापासून तर निवडणुकीचे नियोजन, जाहीर सभा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचार गुंतवणे अशा विविध आघाड्यांवर आमदार धोटे यांची भूमिका महत्त्वाची होती.

हेही वाचा…चंद्रपूर : ताई कन्नमवार यांच्यानंतर सहा दशकानंतर प्रतिभा धानोरकर ठरल्या दुसऱ्या महिला खासदार

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांना अगदी सुरुवातीच्या काळात तिकीट मिळविण्यासाठी पक्ष पातळीवर बराच संघर्ष करावा लागल. राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. वडेट्टीवार कुठल्याही स्थितीत माघार घेण्यास तयार नव्हते तेव्हा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा रजुराचे आमदार सुभाष धोटे यांना लोकसभेची उमेदवारी द्या अशी गळ वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे लावून धरली. तेव्हा आमदार धोटे यांच्या नावाचा मेल देखील पक्षाला पाठविण्यात आला होता. मात्र धोटे यांनी लोकसभा लढायची नाही. स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यु नंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांना नैसर्गिक न्यायाने उमेदवारी द्या, या उमेदवारीवर त्यांचाच हक्क आहे अशी ठाम भूमिका घेतली. तसेच धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आग्रह धरला. वेळ प्रसंगी दिल्लीत तळ ठोकून बसले होते. प्रदेश प्रभारी यांनाही धानोरकर विजयी होतील हे पटवून दिले. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून धानोरकर यांनाच उमेदवारी द्या असा आग्रह धरला होता.

आमदार धोटे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेनंतर पक्षश्रेष्ठी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दोन दिवस अवधी असताना धानोरकर यांची उमेदवारी जाहीर केली. धोटे यांची भूमिका इथेच संपली नाही तर त्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांना स्वतः फोन करून एकत्र एका मंचावर आणले. वडेट्टीवार यांची नाराजी धोटे यांनी ओढवून घेतली. वडेट्टीवार प्रचारात येत नसेल तर काही हरकत नाही. काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करतील अशी टोकाची भूमिका घेतली. मात्र एक वेळ अशीही आणली की धानोरकर यांची वडेट्टीवार यांच्याशी दिलजमाई घडवून आणली.

हेही वाचा…छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, स्फोटके नष्ट

चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यासह अनेक जण धानोरकर यांच्यावर नाराज होते. मात्र या सर्वांच्या भेटी घडवून आणत त्यांची नाराजी दूर केली. जिवती पासून तर आर्णी पर्यंत प्रत्येक ठिकाणी धोटे पायाला भिंगरी लागल्यागत फिरले. आज धोटे यांचे वय ७५ आहे. मात्र या वयातही धोटे यांनी तरुणाला लाजवेल असे परिश्रम घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे नाराज होऊन प्रचारापासून दूर होते. मात्र त्यांनाही प्रचारात सक्रिय केले. रीपाई नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रचारात लावले. स्वतःच्या राजुरा विधानसभा मतदार संघातून धानोरकर यांना १ लाख ३० हजारापेक्षा अधिक मते मिळवून देत मुनगंटीवार यांच्यावर ५८ हजाराची सर्वाधिक आघाडी मिळवून दिली. इतकेच नाही तर उमेदवारी दाखल करण्यापासून मतदानाच्या दिवशी सर्वत्र घर घर फिरले. मतमोजणीच्या धोटे यांना धानोरकर मोठ्या फरकाने जिंकतील असा विश्वास होता. धोटे यांच्या समर्थ साथीमुळेच धानोरकर यांना हा विक्रमी विजय मिळविता आला. म्हणूनच धानोरकर यांच्या विजयात धोटे यांची भूमिका महत्त्वाची आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash dhote s strategic leadership secures record victory for pratibha dhanorkar in chandrapur lok sabha constituency rsj 74 psg